आपली कल्याण डोंबिवली पालिकेतील अधिकाऱ्यांशी ओळख आहे, त्या ओळखीतून आपण कल्याण पश्चिमेतील बिर्ला महाविदयालय रस्त्यावरील इंदिरानगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत स्वस्त दरात सदनिका, गाळे मिळवून देतो असे सांगून ४९ जणांची फसवणूक करण्यात आली. या भामट्याने ४९ ग्राहकांकडून सहा लाख ते ५० लाखापर्यंतच्या रकमा असे एकूण तीन कोटी ४७ लाख रूपये जमा केले होते. खरेदीदारांना गाळे, घरे न देता त्याने त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात सोमवारी तक्रार दाखल करण्यात आली.
केंद्र शासनाच्या निधीतून कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत झोपडपट्टीतील रहिवाशांसाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविली जाते. कल्याण पश्चिमेतील बिर्ला महाविद्यालयाजवळील इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये या प्रकल्पाची घरे उभारण्यात आली आहेत.
पोलिसांनी सांगितले, कल्याणमधील बेतुरकरपाडा येथील दुकानदार कांतिलाल भानुशाली (३३) यांना त्यांचे डोंबिवलीतील परिचित गोविंद भानुशाली यांनी सांगितले की, कल्याण पश्चिमेतील इंदिरानगर मधील पालिकेच्या झोपू योजनेत स्वस्तात घर, गाळे मिळतात. आपण या योजनेत गुंतवणूक केली आहे. तुम्हालाही स्वस्तात गाळे खरेदी करून देतो, असे कांतिलाल यांना सांगितले. सात वर्षापूर्वी ही घटना घडली आहे. गोविंद भानुशाली यांनी कांतिलालची ओळख सुरेश दत्ताराम पवार याच्याबरोबर करून दिली. सुरेशने आपण सरकारी नोकर आहोत. कल्याण डोंबिवली पालिकेत ओळख आहे. त्या ओळखीतून इंदिरानगरमध्ये आपण तुम्हाला स्वस्तात गाळे, सदनिका खरेदी करून देतो. १६ लाख रूपये लागतील असे सांगितले. कांतिलाल यांनी दोन गाळ्यांचे टप्प्याने १२ लाख रूपये सुरेश पवारला त्याच्या गायकरपाडातील इंद्रस्थ येथील घरी दिले. सुरेशने झोपु योजनेची पालिकेची शीर्षक असलेली बनावट कागदपत्र तयार करून ती कांतिलाल यांना दिली. सहा महिन्यात गाळ्यांचा ताबा मिळेल असे सांगितले. सुरेशच्या व्यवहारावर कांतिलाल भानुशाली यांचा विश्वास बसला.
सहा महिने उलटून गाळ्यांचा ताबा मिळत नाही म्हणून वडिल शंकरलाल, मुलगा कांतिलाल यांनी सुरेशकडे तगादा लावला. तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. गाळा नाहीतर पैसे परत करण्याची मागणी केली. सुरेशने दोन लाखाचा धनादेश कांतिलाल यांना दिला. तो बँकेत वठला नाही. त्यानंतर १२ लाखाचा धनादेश दिला. दरम्यान कांतिलाल यांच्या वडिलांचे निधन झाले. कांतिलाल यांना सुरेशने ४९ जणांना झोपु योजनेत घरे, गाळे देतो सांगून तीन कोटी ४७ लाख रूपयांना फसविले असल्याचे समजले. फसवणूक झालेले सर्व खरेदीदार गुजराती समाजातील आहेत. सुरेशने ३५ जणांना योजनेत सदनिका आणि १३ जणांना गाळे देण्याचे आश्वासन दिले होते.
सुरेशने आपली फसवणूक केली आहे. हे लक्षात आल्यावर ४९ जणांच्या तक्रारीवरून बाजारपेठ पोलीस ठाण्यात सोमवारी सुरेश पवार विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
बोगस नावे
पालिका अधिकाऱ्यांची नक्कल, बनावट नावे वापरून झोपु योजनेतील कागदपत्रे तयार करण्यात आली आहेत. शहर अभियंता प्रकाश पुराणिक, मालमत्ता उपायुक्त विषय कुरळेकर नावे बनावट कागदपत्रांवर आहेत. अशा नावाचे अधिकारी पालिकेत कार्यरत नव्हते.