ओवळा-माजिवडा मतदारसंघात ५ फुटबॉल प्रशिक्षण केंद्र उभारणीस राज्य शासनाने मान्यता दिली असून प्रत्येकी १ कोटी याप्रमाणे ५ कोटी रूपयांचा निधी राज्य शासनाने ठाणे महानगरपालिकेकडे वर्ग केला आहे. या प्रशिक्षण केंद्रामध्ये महापालिकेच्या माध्यमातून फुटबॉलचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये अनेक फुटबॉल प्रेमी आहेत. परंतु फुटबॉल खेळाच्या प्रशिक्षणासाठी योग्य मैदान व जागा उपलब्ध नसल्याने क्रिडाप्रेमींची प्रचंड कुंचबना होत होती. क्रीडाप्रेमींकडून याबाबत मागणी होत होती. त्यामुळे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडे याबाबत निधी देण्याची मागणी केली होती. ही मागणी राज्य शासनाने मान्य करत ५ प्रशिक्षण केंद्रे मंजूर केले आहेत. प्रत्येकी एका केंद्रासाठी १ कोटी याप्रमाणे ५ कोटी मंजूर केलेले आहे.

या निधीतून ठाणे महापालिका क्षेत्रातील ओवळा-माजिवडा मतदारसंघातील लोकमान्यनगर येथील रामचंद्र ठाकुर तरण तालवाजवळ, भिमनगर येथील म्हाडा वसाहतीजवळ, पवार नगर येथील प्रबोधनकार ठाकरे मैदानामध्ये, आनंदनगर जवळील स्वामी समर्थ मैदानामध्ये, वाघबीळ येथील मैदानाच्या आरक्षित भुखंडावर फुटबॉल प्रशिक्षण केंद्र उभारणीचे निश्चित झाले आहे. लवकरच कामाला सुरूवात होणार आहे. या फुटबॉल प्रशिक्षण केंद्रामध्ये महापालिकेच्या माध्यमातून फुटबॉलचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार असून फुटबॉलच्या नियमावलीनुसार या ठिकाणी सामने ही खेळविले जाणार आहे. ठाणे शहरातून भविष्यामध्ये पेले सारखे जागतिक दर्जाचे फुटबॉल खेळाडू निर्माण होतील, अशी अपेक्षा आमदार सरनाईक यांनी व्यक्त केली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 5 football training centers will be built in ovala majiwda constituency amy