ठाणे : भिवंडी येथे मित्रासोबत फिरायला गेलेल्या १९ वर्षीय तरुणीवर पाचजणांनी सामूहीक बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलीच्या मित्राला आरोपींनी गावठी कट्टा आणि चाकूचा धाक दाखवून हे कृत्य केले. या घटनेमुळे भिवंडीत खळबळ उडाली असून पाचही आरोपींना भिवंडी तालुका पोलिसांनी अटक केली आहे.
भिवंडीतील पीडित तरुणी मित्रासोबत फिरायला गेली होती. पाच आरोपींनी तिच्या मित्राला गावठी कट्टा आणि चाकूचा धाक दाखवून बाजूला नेले. त्यानंतर या पाचजणांनी त्या तरुणीवर सामूहीक बलात्कार केला. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांच्या पथकाने पीडित तरुणी आणि तिच्या मित्राकडून घटनेची संपूर्ण माहिती घेतली. त्यांनी आरोपीचे वर्णन आणि त्यांच्या दुचाकीची माहिती दिली. त्याआधारे पथकाने परिसरात आरोपींचा शोध घेऊन या पाचजणांना अटक केली असून त्यांनी या गुन्ह्य़ाची कबुली दिली आहे. या सर्वाना न्यायालयाने ३१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.