५ रस्ते, १ पूल बांधण्याचे अर्थसंकल्पात नियोजन

कोंडीत गुदमरलेल्या कल्याण, डोंबिवली शहरांना मोकळा श्वास घेता यावा यासाठी स्थायी समितीने कल्याण, डोंबिवलीच्या विकास आराखडय़ात प्रस्तावित पाच रस्ते आणि ठाकुर्ली येथे आणखी एका पुलाची उभारणी करण्याचा प्रस्ताव पुढे आणला आहे. नवीन रस्ते बांधणीला अर्थसंकल्पात प्राधान्य देण्यात आले आहे.

शिळफाटा रस्त्यावर पलावा चौक, काटई नाका, मानपाडा चौक येथे वाहतूक कोंडी होते. कल्याण, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ परिसरातील आणि भिवंडीकडे ये-जा करणारी वाहने एकाच वेळी शिळफाटा रस्त्यावर येत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडते.

स्थायी समितीने डोंबिवलीतील संदप- आगासन ते बेतवडे हा ‘एमएमआरडीए’च्या विकास आराखडय़ात प्रस्तावित ३० मीटरचा रस्ता बांधण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे पालिका हद्दीतील भारत गिअर (मुंब्रा) ते बेतवडे हा ३० मीटरचा रस्ता बांधण्याचा निर्णय ठाणे पालिकेने घेऊन या कामासाठी ठेकेदारही नियुक्त केला आहे. ठाणे पालिका अधिकाऱ्यांशी चर्चा करून ठाण्याकडून बेतवडेकडे येणारा आणि डोंबिवलीतील संदपकडून बेतवडेकडे जाणारा रस्ता एका जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डोंबिवलीतील प्रवासी शिळफाटा येथे न जाता संदप-बेतवडे ते भारत गिअर (मुंब्रा) नवीन रस्त्याने निघून जातील. ठाण्याकडून येणारे भारत गिअर बेतवडे रस्त्याने संदप येथून डोंबिवलीत जातील व कोंडी घटेल, असे सभापती दीपेश म्हात्रे यांनी सांगितले. आगासन येथील पूल रेल्वेच्या सहकार्याने उभारला जाईल. शिळफाटय़ावरील कोंडी सोडविण्यास हा रस्ता महत्त्वपूर्ण ठरेल.

मानपाडा ते ‘डीएनसी’ रस्ता

शिवाजीनगर येथील साईबाबा मंदिर ते ‘डीएनसी’ शाळेच्या दरम्यान २४ मीटर रुंदीचा रस्ता प्रस्तावित आहे. या रस्त्याने बाधित होणाऱ्या तीन ते चार चाळी जमीनदोस्त केल्या आहेत. या रस्त्यामुळे शिळफाटाकडून येणारी वाहने मानपाडा रस्त्यावरून चार रस्ता, डॉ. शिरोडकर रुग्णालयापर्यंत न येता साईबाबा मंदिरावरून नवीन रस्त्याने डावे वळण घेऊन डीएनसी शाळा ते दत्तनगर, कोपर पुलाने डोंबिवली पश्चिमेत निघून जातील.

कल्याण पूर्वेत रस्ते

कल्याण पूर्वेत मलंगगड ते श्रीराम सिनेमा १०० फुटी रस्ता, काटेमानिवली येथे १८ फुटी रस्ता प्रस्तावित आहे. काटेमानिवली येथील सध्याचा उड्डाणपूल विठ्ठलवाडी दिशेने उतरविण्यात आला आहे. त्या ठिकाणी तो तोडून विठ्ठलवाडी आगारासमोर उतरविण्यात येईल. यामुळे नेतिवलीकडून येणारी वाहने थेट उल्हासनगरकडे जातील. ठाकुर्ली येथे नव्वद फुटी रस्त्याला जोडून कुंभारखाण पाडा भागात जाणारा उड्डाणपूल विकास आराखडय़ात आहे. २४ मीटर रुंदीच्या या पुलामुळे नव्वद फुटी रस्त्यावरील डोंबिवली पश्चिमेतील वाहने या पुलावरून ये-जा करतील.

Story img Loader