ठाणे : ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात एका ५० वर्षी व्यक्तीचा त्याच्या विरोधातील तक्रार नोंदवित असताना मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी उघडकीस आली. याप्रकरणाची नोंद ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. मृत्यूचे स्पष्ट कारण अद्याप कळले नसले तरी हृदयविकाराचा झटका येऊन त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांना आहे. मृत व्यक्ती विरोधात एका २५ वर्षीय तरूणीचा सुमारे महिन्याभरापासून पाठलाग केल्याचा आरोप होता. त्यानुसार, त्याला गुरूवारी सकाळी ठाणे रेल्वे स्थानकात रेल्वे सुरक्षा दलाने ताब्यात घेतले होते.
हा प्रकार लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीत घडल्याने त्याला ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्याच्याविरोधातील तक्रार नोंद होत असताना अचानक तो कोसळला. त्याचा मृतदेह मुंबईतील शासकीय रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांना आहे. पोलीस ठाण्यात घडलेल्या प्रकाराचे सीसीटीव्ही चित्रीकरण उपलब्ध झाले असून पोलीस ठाण्यात आणण्यापूर्वीचे सीसीटीव्ही चित्रीकरण लोहमार्ग पोलीस मिळवित आहे. याप्रकरणाची नोंद ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणाचा पुढील तपास आता राज्य गुन्हे अन्वेषण विभाग करणार आहे.