डोंबिवली : डोंबिवली जवळील ठाकुर्लीतील चोळेगाव तलावाजवळ गुरुवारी रात्री एका ५० वर्षाच्या व्यक्तिने एका २९ वर्षाच्या विवाहितेचा रात्रीच्या वेळेत विनयभंग केला. या व्यक्तिने महिलेला स्वताजवळ ओढावून घेऊन तिच्याकडे लैंगिक सुखाची मागणी केली. या महिलेने जोरदार प्रतिकार करताच व्यक्तिने त्या महिलेचा गळा आवळून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

या महिलेने या व्यक्तिच्या तावडीतून मोठ्या मुश्किलीने सुटका करून घेत घर गाठले. ही महिला व विनयभंग करणारा इसम एकाच इमारतीत राहतात. या महिलेने रामनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार केली आहे. पोलिसांनी इसमा विरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक केली आहे. पतीने केलेल्या गैरकृत्याची माहिती पोलिसांनी इसमाच्या पत्नीला दिली आहे.

चोळे गाव तलाव गणपती विसर्जन तलाव आणि सकाळ, संध्याकाळ नागरिकांच्या फिरण्याचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. डोंबिवली, ठाकुर्ली भागातील नागरिक याठिकाणी फिरण्यासाठी येतात. या तलावाच्या ठिकाणी एका महिलेचा विनयभंग झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पीडित महिलेने पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की बुधवारी रात्री पावणे दहा वाजता घरातील कुटुंबीयांचे भोजन झाल्यानंतर आपण घरातील खरकटे पाणी टाकण्यासाठी बाहेर पडलो होतो. घराजवळून नाला वाहतो त्यात हे पाणी टाकणार होते. घरातून बाहेर पडून नाल्याजवळ खरकटे टाकण्यासाठी गेले असता, तेथे सोसायटीत राहणार व्यक्ति आपल्या पाठीमागून आला. त्याने पीडित महिलेला काही कळण्याच्या आत पीडितेला जोराने स्वताजवळ ओढून घेतले. या महिलेशी अश्लील कृत्य करून तिचा विनयभंग केला. तिच्याकडे लैंगिक सुखाची मागणी केली. इसमाने महिलेला पकडून ठेवले. त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी महिला प्रयत्न करत असताना इसमाने महिलेचा गळा दाबून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

सार्वजनिक ठिकाणी हे गैरकृत्य इसमाने केल्याने महिला संतप्त झाली होती. महिलेने कडवा प्रतिकार करत इसमाच्या तावडीतून स्वताची सुटका करून घेतली. ती धावतपळत घरी आली. घडला प्रकार तिने कुटुंबीयांना सांगितला. या इसमाच्या ताब्यातून सुटले नसेत तर आपला जीव वाचला नसता, असे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. या महिलेने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ इसमाला अटक केली. याप्रकरणाचा तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक अच्युत मुपडे करत आहेत.