सिडकोच्या आराखडय़ातील रस्ता बनविण्याचा पालिकेचा घाट; जुचंद्र गावातील ५०० घरांवर बुलडोझर

वसईच्या जुचंद्र गावातून अंतर्गत रस्ता विकसित करण्याचा निर्णय वसई-विरार महापालिकेने घेतला आहे. मात्र त्यांच्या या निर्णयामुळे गावातील ५०० कुटुंबीयांना रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. कारण या रस्तेविकासाच्या आड येणारी ५०० घरे जमीनदोस्त करण्यात येणार आहेत. या रस्त्याची गरज नसताना तो विकसित करण्याचा घाट पालिकेने घातल्याने ग्रामस्थांनी त्याला तीव्र विरोध केला आहे.

वसई-वरार महापालिका हद्दीतीेल नायगावजवळील जुचंद्र हे प्रमुख गाव आहे. सिडकोने तयार केलेल्या विकास आराखडय़ात या गावातून रस्ता प्रस्तावित केलेला होता. आता पालिकेने तो विकसित करण्याचे ठरविले आहे. त्याचे सर्वेक्षणही करण्यात आले आहे. परंतु या रस्त्याच्या मार्गात पाचशे घरे येत असून ती तोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. बुधवारी या मार्गातले दोन मजली घर जमीनदोस्त करण्यात आले. यामुळे संतप्त ग्रामस्थानी शुक्रवारी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली पालिकेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. शहराचा विकास ग्रामस्थांना उद्ध्वस्त करून का केला जात आहे, असा सवाल यावेळी करण्यात आला.

ग्रामस्थ संतप्त

सिडकोने मंजूर केलेला विकास आराखडा २०१९मध्ये बाद होणार आहे. मग २६ वर्षांनंतरच हा घाट का घातला जातोय, असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे. बिल्डराच्या फायद्यासाठी या रस्ता विकसित करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. या रस्त्याच्या विरोधात गावातील जनमत प्रक्षुब्ध झाले असून ग्रामस्थ उग्र आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.

पूर्वी सिडको हे नियोजन प्राधिकरण होते. ग्रामपंचायत असताना घरे बांधण्यासाठी सिडकोची परवानगी घेणे आवश्यक होते. परंतु सिडकोकडून ग्रामस्थांनी परवानगी न घेतल्याने ही घरे अनधिकृत ठरविण्यात आलीे आहेत. १९९०मध्ये सिडको स्थापन झाली. ही घरे त्याच्या पूर्वीची म्हणजे ४० वर्षांपूर्वीची आहेत. गावात तीन अंतर्गत रस्ते आहेत. मग पुन्हा नव्या रस्त्याची गरज काय?

– किरण म्हात्रे, स्थानिक शिवसेना नेते

विकास आराखडय़ात हा रस्ता दाखविण्यात आलेला आहे. परंतु ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन पुन्हा सव्रेक्षण केले जाईल.

– डॉ. किशोर गवस, पालिका उपायुक्त

२००७मध्येच आराखडा मंजूर झालेला आहे. पुढील कारवाईचा निर्णय प्रशासकीय स्तरावर घेतला जाईल.

– संजय जगताप, उपसंचालक, नगररचना विभाग

गावातील लोकांची घरे वाचली पाहिजे, ही आमची भूमिका आहे. त्यामुळे आमचा या रस्त्याला विरोध आहे.

– कन्हैय्या भोईर, स्थानिक नगरसेवक

Story img Loader