लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील व्यापारी, दुकानदार, विक्रेते अधिक प्रमाणात प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर करत असल्याच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत कल्याण डोंबिवली पालिका आणि प्रदूषण नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांनी बाजार समिती आवारात अचानक छापे टाकून दुकानदारांकडून ५०० किलो प्रतिब्ंधित प्लास्टिक जप्त केले.
बाजार समितीमधील फूल बाजारातील रामनाथ गुप्ता यांचे फूल दुकानात अधिक प्रमाणात प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर होत असल्याच्या तक्रारी पालिकेकडे आल्या होत्या. त्यांच्या दुकानातून अधिक प्रमाणात प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली, अशी माहिती घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी दिली.
आणखी वाचा-कल्याण : रस्त्यावरील किराणा सामान हटविण्यास सांगितले म्हणून दुकानदाराची मारहाण
उपायुक्त पाटील यांच्या आदेशावरून मुख्य स्वच्छता अधिकारी वसंत देगलुरकर, क प्रभागाचे स्वच्छता अधिकारी संदीप खिसमतराव, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी उपेंद्र कुलकर्णी, साहाय्यक अधिकारी राजेश नांदगावकर, राजेंद्र राजपूत, जयंत कदम यांच्या पथकाने ही कारवाई केली.
मागील काही वर्षापासून कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत प्रतिबंधित प्लास्टिक वापरण्यास बंदी आहे. या प्लास्टिकचा चोरून लपून वापर करणाऱ्या दुकानदार, विक्रेत्यांवर पालिकेने यापूर्वी दंडात्मक कारवाया केल्या आहेत. पालिका हद्दीत पुन्हा प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांचा अधिक प्रमाणात वापर केला जात आहे, अशा तक्रारी पालिकेत येत होत्या. अतिरिक्त पालिका आयुक्त हर्षल गायकवाड यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, पालिका घनकचरा विभागाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन पालिका हद्दीत नव्याने प्रतिबंधित प्लास्टिक वापराविरुध्द मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. या आदेशाप्रमाणे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात अधिक प्रमाणात प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर केला जात असल्याच्या तक्रारी असल्याने तपासणी पथकाने पहिले याठिकाणी छापा मारून ५०० किलो प्रतिबंधिक प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या.
अशीच कारवाई कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील लक्ष्मी भाजीपाला बाजारात आणि कल्याण, डोंबिवलीतील मोकळ्या जागांमध्ये भरणाऱ्या बाजारांवर केली जाणार आहे, असे पालिका अधिकाऱ्याने सांगितले. बहुतांशी प्रतिबंधित प्लास्टिक विक्रेते घाऊक पध्दतीने उल्हासनगरमधून आणतात. काही जण मुंबई मस्जिद, भायखळा भागातून आणतात अशा तक्रारी आहेत. पालिकेने प्रतिबंधित प्लास्टिक उत्पादित कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींकडून केली जात आहे.