ठाणे : नाशिक आणि नगर जिल्ह्यात आदिवासी मुलांना वेठबिगारी म्हणून राबवण्यात आल्याचा प्रकार ताजा असताना ठाणे आणि पालघर जि्ल्ह्यातील आदिवासी मुलांचाही नगर जिल्ह्यात वेठबिगारी म्हणून वापर होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील दोन मुलांची आणि पालघर जिल्ह्यातील दोन मुलींची अवघ्या ५०० ते एक हजार रुपयांमध्ये वेठबिगारी म्हणून खरेदी करण्यात आली आहे. या मुलांकडून जनावरे सांभाळणे, शेण काढणे तसेच घरातील विविध कामे मेंढपाळ करुन घेत होते. तसेच त्यांना शिवीगाळही करत. याप्रकरणी नगर जिल्ह्यातील मेंढपाळांविरोधात भिवंडीतील पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यातील दोन आणि पालघरमधील एका मुलीची सुटका झाली असून एक मुलगी अद्यापही बेपत्ता आहे. मुले परत मिळाल्याने पालकांनाही अश्रू अनावर झाले होते.
हेही वाचा >>> जलस्त्रोत काठोकाठ; बारवी, आंध्रा धरण भरले, जिल्ह्याची पाणीचिंता मिटली
भिवंडीतील वडवली येथील खोताचा पाडा परिसरातील एक कातकरी महिलेच्या १७ वर्षीय मुलाला कर्जत तालुक्यातील ताजू येथील भिवा गोयकर या मेंढपाळाने १ हजार ५०० रुपये देऊन वर्षभरापूर्वी वेठीबिगार म्हणून ठेवले होते. भिवाने महिलेला तिच्या मुलाचे लग्नही आम्ही लावून देऊ असे सांगितले होते. मुलाला घरी नेल्यावर त्याला भिवा शिवीगाळ करत असे. तसेच त्याच्याकडून खूप काम करून घेत असे. अखेर या जाचाला कंटाळून मुलगा घरी त्याच्या परतला. त्यानंतर महिलेने याप्रकरणी श्रमजीवी संघटनेच्या मदतीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
हेही वाचा >>> ठाणे महापालिकेच्या वास्तू रेडी-रेकनर दराने भाडेतत्वावर देण्याचा निर्णय
तर दुसरा प्रकार हा वाफाळे येथील सगपाडा परिसरातील आहे. येथील कातकरी महिलेने देखील तिच्या १२ वर्षीय मुलाच्या बालमजुरी आणि वेठीबिगारीची तक्रार दिली आहे. गरिबी आणि अज्ञान याचा गैरफायदा घेत संभाजी खताळ या नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील मेंढपाळाने दीडवर्षांपूर्वी या १२ वर्षाच्या मुलाला मजूर म्हणून ५०० रुपये देऊन एक प्रकारे विकत घेतले होते. तिकडे नेऊन या मुलाकडून कामे करून घेतली. बालमजुरी, वेठीबिगारी प्रकरणे उजेडात आणल्यानंतर संभाजीने मुलाला घरी आणून सोडून दिले. या दोन्ही प्रकरणात पडघा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले असून पोलिसांकडून मेंढपाळांना नोटीस बजावण्याचे काम सुरू आहे.
हेही वाचा >>> डोंबिवली पश्चिम काही भागाचा वीज पुरवठा आज सात तास बंद
जव्हारमधील मुलीचीही सुटका
पालघर येथील जव्हार तालुक्यातील धारणहट्टी भागात आठ आणि सहा वर्षाच्या मुली नगर जिल्ह्यातील अकोले येथील पुंडलिक कांदाडकर, देवराम कांदाडकर यांच्याकडे बाल मजुरी करत होत्या. या दोघीही सख्या बहिणी आहेत. यातील आठ वर्षीय मुलगी ही तीन वर्षांपासून तर काळू ही मुलगी एका वर्षापासून मजुरी करत होती. आठ वर्षीय मुलीला पुंडलिकने शनिवारी जव्हार येथे सोडले. या घटनेची माहिती श्रमजीवीचे रवींद्र वाघ यांना मिळताच संघटनेचे कार्यकर्ते या प्रकरणात पुढे आले. मुलीच्या वडिलांना कांदाडकर यांनी तिच्या मजुरीसाठी वर्षाला १२ हजार रुपये आणि एक मेंढी असे ठरविले होते. परंतु सुरवातीला ५०० रुपयां व्यतिरिक्त काहीही दिलेले नाही. या मालकाने तिला शेण भरणे , लेंड्या साफ करणे, मेंढ्यांचे दुध काढणे, मेंढ्यांबरोबर फिरणे, पाणी आणणे, मेंढ्या व गाईची सफाई करणे अशी अनेक कामे देऊन राबवून घेतले. तर, तिची बहिण अद्याप बेपत्ता आहे. याबाबत जव्हार पोलीस ठाण्यात श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांच्या पुढाकारणे गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.