अंबरनाथः अंबरनाथ पश्चिमेतील स्थानक परिसरात असलेल्या भाजी मंडई परिसरात गुरूवारी रात्री दोन भटक्या श्वानांनी तब्बल ५२ जणांचा चावा घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यातील जखमींवर जवळील डॉ. बी. जी. छाया उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकारामुळे भटक्या श्वानांच्या निर्बिजीकरणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गुरूवारी सायंकाळी अंबरनाथ पश्चिमेतील रेल्वे स्थानक, सर्कस मैदान, छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई तसेच पोलीस पेट्रोल पंप भागात दोन भटक्या श्वानांनी उच्छाद मांडला.
हेही वाचा >>> मोहरम निमित्ताने मुंब्रा, भिवंडीत वाहतूक बदल
रिक्षा चालक, फेरीवाले आणि स्थानक परिसरात ये जा करणाऱ्या या श्वाानांनी दिसेल त्या व्यक्तीला चावा घेतला. त्यामुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. एकाच वेळी एकाहून अधिक जखमी श्वानाच्या चावा घेतल्याच्या तक्रारी घेऊन येत असल्याने शेजारी असलेल्या डॉ. बी. जी. छाया रूग्णालयातील कर्मचारी वर्गही चक्रावला. गुरुवारी रात्री ३५ तर शनिवारी सकाळी १७ जखमींनी रुग्णालयात उपचारासाठी धाव घेतल्याची माहिती रूग्णालय प्रशासनाच्या वतीने देण्यात आळी. या घटनेची माहिती मिळतात पालिकेच्या पथकाने श्वानांची धरपकड केली. यातील एका श्वानाला उपचारासाठी मुलुंड येथे पाठवण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. या प्रकारामुळे भटक्या श्वानांचा आणि त्यांच्या निर्बिजीकरणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.