ठाणे : ठाण्यातील घोडबंदर भागातील घरातून पोलिसांनी शुक्रवारी ५३ लाख ४६ हजाराची रोकड जप्त केली आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील गैरव्यवहारप्रकरणी तुरुंगात असलेले आमदार रमेश कदम यांचा मित्र राजू खरे याच्या घरात ही रोकड सापडली.
तुरुंगात असलेल्या रमेश कदम यांच्या वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना पोलीस पथकाने एका खासगी वाहनातून राजू याच्या घरी नेताना हा प्रकार उघडकीस आला. आमदार कदम यांना मुंबईत वैद्यकीय तपासणी करून पुन्हा कारागृहात आणण्यात येत होते. परतत असताना त्याने घोडबंदर येथील पुष्पांजली इमारतीत राहणाऱ्या राजू खरे याला भेटण्याची विनंती पोलिसांना केली. कदम यांना विनापरवानगी राजूच्या घराबाहेर आणले आणल्याची माहिती कासारवडवली पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी राजूच्या घराची झडती घेतली. त्यावेळी पोलिसांना त्याच्या घरात ५३ लाख ४६ हजारांची रोकड सापडली. ही रोकड विधानसभा निवडणुकीत वापरण्यात येणार होती का? कदम यांचा या रकमेशी काही संबंध आहे का याचा तपास सुरू आहे. परवानगी नसतानाही कदम यांना त्यांच्या मित्राच्या घरी घेऊन जाणाऱ्या पोलीस पथकावरही कारवाई करण्यात आली आहे.