Mira Road Crime News : दिल्लीतल्या श्रद्धा वालकर हत्याकांडामुळे संपूर्ण देश हादरला होता. त्या घटनेला काही महिने उलटत नाहीत तोच मुंबईतल्या मीरा रोडमध्ये अत्यंत क्रूर आणि भयंकर घटना उघडकीला आली आहे. मिरा रोडमध्ये राहणाऱ्या मनोज सानेने त्याच्या लिव्ह इन पार्टनरची हत्या केली. एवढंच नाही तर हत्येनंतर त्याने लाकूड कापण्याच्या मशीनने तिच्या मृतदेहाचे तुकडे केले. त्यानंतर हे तुकडे कुकरमध्ये शिजवून आणि मिक्सरमध्ये बारीक करुन त्यांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. शेजाऱ्यांना त्याच्या घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला.
मनोज सानेच्या शेजारी राहणाऱ्या सोमेश श्रीवास्तव यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर पोलीस घटनास्थळी आले होते. पोलिसांसह सोमेशही होते. सानेंच्या फ्लॅटमध्ये पोलिसांसह सोमेशही गेले होते. सोमेश यांनी घटनास्थळी काय काय होतं त्याचं वर्णन केलं आहे जे अंगावर काटा आणणारं आहे.
काय होतं मनोज सानेच्या घरात?
फ्लॅटमध्ये महिलेचे पाय पोलिसांना सापडले, त्यानंतर घरातल्या एका बादलीत आणि पातेल्या महिलेचं धड आणि शीर यांचे तुकडे होते. कुकरमध्ये ते शिजवून लपवण्यात आले होते. काही भाजलेले तुकडेही पोलिसांना आढळून आले आहेत. वुड कटरच्या वापराने त्याने लिव्ह इन पार्टनरच्या मृतदेहाचे तुकडे केले. त्यानंतर ते मिक्सरमध्ये बारीक केले. काही तुकडे कुकरमध्ये शिजवले. या सगळ्या तुकड्यांची तो विल्हेवाट लावत होता. पोलिसांनी ही माहिती दिली आहे.
अद्याप या महिलेच्या मृतदेहाचे काही भाग हे हरवलेले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी यासाठीची शोध मोहीम सुरु केली आहे. श्रद्धा वालकरच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करण्यात आले होते. ही हत्या आफताब पूनावालाने केली होती. मीरा रोडच्या या घटनेत मनोज सानेनेही तसंच केलं आणि त्याची लिव्ह पार्टनरची आधी हत्या केली आणि त्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे केले. पोलिसांनी मनोजच्या घरात जे काही आढळलं ते सगळं जप्त केलं आहे. तसंच मनोज सानेला अटकही करण्यात आली आहे.
डीसीपी जयंत बजबळे यांनी काय म्हटलं आहे?
एका इमारतीच्या सातव्या मजल्यावर दुर्गंधी येत असल्याची तक्रार स्थानिक पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. फ्लॅटचं कुलुप तोडून प्रवेश केला असता पोलिसांना घटनास्थळी मृतदेहाचे कापलेले तुकडे सापडले. त्याचबरोबर कटरही सापडलं आहे. त्याच अनुषंगाने तपास केला आणि मृत महिलेची ओळख पटवली. या प्रकरणातल्या आरोपीलाही अटक करण्यात आली आहे. मृतदेहाचे तुकडे आम्ही जे. जे. रुग्णालयात पाठवले आहेत. आमचा पुढील तपास सुरु आहे. मनोजच्या लिव्ह इन पार्टनरने म्हणजेच सरस्वतीने आत्महत्या केल्याचा दावा खोटा आहे. आम्हाला मनोजच्या घरात सरस्वतीच्या मृतदेहाचे असंख्य तुकडे सापडले. सरस्वती आणि मनोज हे दहा वर्षांपासून एकत्र राहात होते. सरस्वती अनाथ होती तिला कुणीही नातेवाईक नाहीत. तिचं शिक्षण १० वीपर्यंत झालं होतं. ३ पातेली, दोन बादल्या आणि कुकर यामध्ये मृतदेहाचे तुकडे होते. ४ जूनपासून सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे कापत होता. या घटनेनंतरही आरोपी मनोज त्याच घरात राहात होता. किचनमध्ये तुकडे शिजवत होता आणि जेवायला बाहेर जात होता अशी माहिती डीसीपी जयंत बजबळेंनी दिली आहे.
साने यांच्या शेजाऱ्याने काय सांगितलं?
साने यांच्या शेजाराऱ्याने ANI ला सांगितलं की, मनोज साने यांच्या घरातून दुर्गंधी येत होती. मनोज साने हे कुणामध्ये मिसळत नव्हते. मी तीन वर्षे त्यांच्या शेजारी राहतो आहे पण त्यांचं नाव काय ते पण मला माहित नव्हतं. कुठल्याही सणासुदीलाही ते बाहेर पडायचे नाहीत. सोमवारी मला त्यांच्या घरातून वास येऊ लागला. मला वाटलं की उंदीर मेल्यामुळे वास येतील. आपल्या घराच्या शेजारी अशी काही हत्या वगैरे झाली असेल हे तर आम्हाला कधी वाटलंही नव्हतं. आम्ही असं हत्याकांड, खुनाचे प्रकार हे सगळे टीव्ही सीरीयल्समध्ये पाहिले आहेत. सुरुवातीला वाटलं की उंदीर मेला असेल. मला वास आल्यानंतर मी साने यांना सांगितलं. त्यांच्या घराला अर्धावेळ तर कुलुप असायचं. मंगळवारी मी आल्यानंतर वास खूप मोठ्या प्रमाणावर आला. मी त्यांना बोलवायला गेलो. दार वाजवलं. पण काहीही प्रतिसाद आला नाही. मग मी थोडावेळ थांबलो तर मला रुम फ्रेशनरचा वास आला.
रुम फ्रेशनरचा वास येऊ लागल्यावर मला थोडा संशय आला. पण त्यांनी दरवाजा उघडला नाही. मग मी वास असह्य होऊ लागल्याने जरावेळ खाली गेलो. तर १० मिनिटातच मनोज साने बॅग घेऊन खाली आले. मी त्यांना सांगितलं तुमच्या घरातून दुर्गंध येतो आहे. उंदीर वगैरे मेला आहे की आपण पाहू. तर ते म्हणाले मला तातडीने बाहेर जायचं आहे. मी त्यांना म्हटलं अहो पाच मिनिटं चला एकदा आपण पाहू काय झालंय का? पण त्यांनी काही ऐकलं नाही. ते घाईने निघून गेले. मी परत येतो तेव्हा पाहू म्हणाले. मग मी इमारतीच्या सेक्रेटरीला याविषयी सांगितलं. स्प्रे मारल्यानंतर त्यांनी दरवाजा उघडला नाही. पण जेव्हा मनोज साने खाली उतरले तेव्हा त्यांच्या अंगालाही दुर्गंधी येत होती आणि घाबरले होते. मला संशय होताच त्यामुळे सेक्रेटरींना सांगितल्यानंतर त्यांनी त्या एजंटला बोलावलं ज्याने तो फ्लॅट सानेंना दिला होता. एजंट आला, त्याच्याकडे चावी होतीच. पण तेव्हा वास येत नव्हता कारण तेव्हा त्यांनी रुम फ्रेशनर मारला होता. असं मनोज साने यांच्या शेजाऱ्याने सांगितलं आहे.