ठाणे : महापालिकेच्या वेशीवर असलेल्या दिवा परिसरात रुग्णालयाकरिता भूसंपादनासाठी राज्याच्या नगरविकास विभागाने ५८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामुळे दिव्यात रुग्णालय उभारणीचा मार्ग मोकळा झाला असून, या रुग्णालयामुळे दिवेकरांची आरोग्य सुविधेसाठी शहराबाहेर होणारी वणवण थांबणार आहे.
ठाणे महापालिकेच्या वेशीवर असलेल्या दिवा परिसराची लोकसंख्या चार ते पाच लाखांच्या आसपास आहे. दिवा शहरातील नागरिकांना आरोग्य सेवेसाठी ठाणे, मुंबई तसेच इतर मोठ्या शहरात जावे लागते. या पार्श्वभूमीवर पालिकेने दिवा शहरात सात ठिकाणी ‘वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू केले आहेत. या दवाखान्यात नागरिकांना मोफत तपासणी औषध दिली जातात. या दवाखान्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्यादेखील खूप मोठी आहे. परंतु पुढील उपचारासाठी नागरिकांना इतर शहरांमध्ये जावे लागत आहे. त्यामुळे दिव्यात रुग्णालय उभारणीची मागणी होत होती. या भागातून गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेनेचे आठ नगरसेवक निवडून आले होते. तसेच कल्याणचे खासदार श्रीकांत शंदे यांच्या मतदारसंघात हा परिसर येतो. त्यामुळे राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या भागावर शिवसेनेने गेल्या काही वर्षांपासून लक्ष केंद्रीत करून पायाभूत सुविधा निर्माण करण्यास सुरूवात केली आहे. या भागातील रस्ते कामे, वाढीव पाणीपुरवठा तसेच कचराभूमी बंद करणे अशा कामांपाठोपाठ आता या ठिकाणी रुग्णालय उभारणीसाठी हालचाली सुरू केल्या होत्या. या रुग्णालयाच्या उभारणीसाठी खासदार शिंदे आणि माजी उपमहापौर रमाकांत मढवी हे सातत्याने प्रयत्नशील होते. परंतु भूसंपादन होत नसल्याने रुग्णालयाच्या कामात अडथळा निर्माण झाला होता.
हेही वाचा – डोंबिवलीत बेधुंद वाहन चालकाची १२ वाहनांना धडक, १० जण जखमी
शेतकऱ्यांना रोख रकमेच्या स्वरुपात मोबदला देण्यात यावा अशी मागणी खासदार शिंदे यांनी केली होती. तर, शेतकऱ्यांना टीडीआरऐवजी थेट रोख रक्कम स्वरुपात मोबदला देण्यात यावा, असा ठराव माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी पालिकेत मांडला होता. त्यास पालिकेने मंजुरी देऊन आर्थिक तरतुदीसाठी हा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता. त्यास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिरवा कंदील दाखवत रुग्णालयाच्या भूसंपादनासाठी तब्बल ५८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.