भगवान मंडलिक

कल्याण: टिटवाळा ते हेदुटणे ३० किलोमीटर लांबीच्या बाह्यवळण रस्ते मार्गावरील कल्याण मधील दुर्गाडी ते डोंबिवलीतील मोठागाव (माणकोली पूल) वळण रस्ते कामासाठी मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या कार्यकारी समितीने ५९८ कोटी १२ लाखाच्या निवीदेला अंतीम मंजुरी दिली आहे. सीआरझेडच्या अंतीम मंजुऱ्या मिळाल्यानंतर ठेकेदाराला कार्यारंभ आदेश प्राधिकरणाकडून देण्यात येणार आहेत.

डोंबिवलीतील मोठागाव येथील उल्हास खाडीवरील माणकोली उड्डाण पूल बांधून तयार झाला आहे. या पुलाच्या पोहच रस्त्याचा एक महत्वाचा भाग मोठागाव ते दुर्गाडी वळण रस्ता आहे. सात किलोमीटर लांबीचा हा वळण रस्ते मार्ग आहे. या रस्ते मार्गात पत्रीपूल, कांचनगाव, नवापाडा, देवीचापाडा, मोठागाव, कुंभारखाणपाडा भागातील २०० हून अधिकच्या शेतकऱ्यांची जमीन संपादीत करण्यात आली आहे. या मार्गातील काही भाग सरकारी, रेल्वे जमिनीचा आहे. या जमिनीचे ८७ टक्के भूसंपादन कल्याण डोंबिवली पालिकेकडून पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे या रस्ते कामाला ‘एमएमआरडीए’ कार्यकारी समितीने मंजुरी द्यावी अशी मागणी कल्याण, डोंबिवलीतील लोकप्रतिनिधीकडून होत होती.

हेही वाचा >>> Navratri festival 2023: नवरात्रौत्सवात गैरप्रकार रोखण्यासाठी पोलिसांची नजरा; आयुक्तालय क्षेत्रात ५९५ देवींची प्रतिष्ठापना

‘एमएमआरडीए’ने १०० टक्के भूसंपादन झाल्या शिवाय हे काम हाती घेणार नाही असा पवित्रा मागील दोन वर्षापासून घेतला होता. त्यामुळे पालिका प्रशासन अडचणीत आले होते. दुर्गाडी-मोठागाव वळण रस्त्यामुळे माणकोली पुलाच्या पोहच रस्त्याचा एक महत्वाचा टप्पा पूर्ण होणार आहे. माणकोली पुलावरून ठाणे दिशेकडून येणारी काही वाहने माणकोली पूल येथे डावे वळण घेऊन देवीचापाडा, नवापाडा, गणेशनगर भागातून डोंबिवली शहराच्या अंतर्गत भागात येतील. ठाणे दिशेकडे जाणारी वाहने याच मार्गाने जातील. काही वाहने कांचनगाव भागातून खाडी किनाऱ्याने पत्रीपूल दिशेकडून गोविंदवाडी मार्गे, शिवाजी चौक मार्गे कल्याण शहरात जातील, असे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा >>> कल्याणमधील शाळेत विद्यार्थ्यांकडून वृत्तपत्राचे वाचन; वाचन प्रेरणा दिनानिमित्त उपक्रम

या रस्ते मार्गावर देवीचापाडा येथे दिवा-वसई रेल्वे मार्गाखाली एक भुयारी रस्ते मार्ग तयार केला जाणार आहे. हा महत्वाचा टप्पा बांधून पूर्ण झाल्यानंतर डोंबिवली-कल्याण शहरे बाह्य वळण रस्त्याने एकमेकांना जोडली जाणार आहेत. या रस्त्यामुळे डोंबिवलीहून कल्याणकडे जाण्यासाठी घरडा सर्कल, ठाकुर्ली ९० फुटी रस्ता आणि आता नव्याने होणारा मोठागाव-दुर्गाडी वळण रस्ता असे तीन मार्ग उपलब्ध होणार आहेत. यामुळे येत्या काळात दोन रस्त्यांवर येणारा भार कमी होऊन वाहतूक कोंडी टळण्यास मदत होणार आहे.

ठेकेदार नियुक्त

मोठागाव-दुर्गाडी वळण रस्ते कामासाठी मे. ऋत्विक आरपीएस, मे. गवार एनएसीपीएल, मे. एमईआयएल कंपन्यांनी निवीदा प्रक्रियेत भाग घेतला होता. त्यापैकी मे. ऋत्विक कंपनीची निवीदा ‘एमएमआरडीए’च्या कार्यकारी समितीच्या बैठकीत अंतीम करण्यात आली. सीआरझेडच्या अंतीम मंजुऱ्या मिळाल्यानंतर ठेकेदाराला कार्यारंभ आदेश प्राधिकरणाकडून देण्यात येणार आहेत. ही कामे तातडीने सुरू होणार असल्याने भूसंपादनाची जबाबदारी असलेल्या कल्याण डोंबिवली पालिकेने नगररचना, बांधकाम विभागातील अधिकारी, कर्मचारी यंत्रणा मोठागाव-दुर्गाडी रस्त्यावरील अतिक्रमणे हटविणे, उर्वरित भूसंपादन, जमीन मालकांच्या ताबा पावत्या करून घेणे या कामासाठी जु्ंपली आहे.

Story img Loader