ठाणे येथील बाळकुम परिसरातील रुणवाल आयरीन या निर्माणधीन इमारतीच्या ४० मजल्यावरून उदवाहक कोसळून सहा कामगारांचा मृत्यू झाला आहे. एक कामगार गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. रविवारी सायंकाळी ही घटना घडली असून या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे. हा अपघात नेमका कसा झाला याविषयी अद्याप समजू शकलेले नाही.
हेही वाचा >>> कल्याणमध्ये अल्पवयीन विद्यार्थीनीची आत्महत्या; चार तरुणांविरुध्द गुन्हा दाखल
महेंद्र चौपाल (३२ ), रुपेश कुमार दास (२१), हारून शेख (४७), मिथलेश (३५), कारिदास (३८), अशी पाच मृत कामगारांची नावे आहेत तर, एक कामगारांचे नाव समजू शकलेले नाही. सुनिल कुमार दास (२१) हा कामगार गंभीर जखमी आहे. बाळकुम येथील नारायणी शाळेच्या बाजूला रुणवाल आयरीन या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. ४० मजल्याची ही इमारत आहे. या इमारतीच्या छतावर रविवारी वॉटरप्रूफिंगचे काम सुरू होते. हे काम संपवून कामगार सायंकाळी ५.३० वाजता उदवाहकने खाली येत होते. त्यावेळी उदवाहकाचा दोर तुटून अपघात झाला.
दीड ते दोन तासानंतर इतर कामगार तेथून जात असताना हा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दलाच्या जवान आणि स्थानिक माजी नगरसेवक संजय भोईर यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. उदवाहकामध्ये अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यात आले. या दुर्घटनेत सहा कामगारांचा जागीच मृत्यू झाला होता. तर सुनिल हा कामगार गंभीर जखमी झाला आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हा अपघात नेमका कसा झाला याविषयी अद्याप समजू शकलेले नाही. या अपघाताची पोलीस चौकशी करीत आहेत.