कल्याण – टिटवाळा मांडा परिसरातील सदगुरूनगर, सिध्दीविनायक काॅलनी, पिंपळेश्वर मंदिर मागे, हरीओम वेली रस्ता भागात सुरू असलेल्या बेकायदा चाळी, ५२ हून अधिक निर्माणाधिन जोते अ प्रभागाच्या तोडकाम पथकाने गुरुवारी दिवसभरात जमीनदोस्त केले. गेल्या आठ दिवसाच्या कालावधीत अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी तोडकाम पथकाच्या साहाय्याने दोनशेहून अधिक बेकायदा चाळी, जोते, गाळ्यांची बांधकामे जमीनदोस्त केली.
बल्याणी टेकडी, बनेली, सांगोडा भागातील बेकायदा चाळी, जोते तोडून झाल्यानंतर गुरुवारी सकाळी साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी मांडा टिटवाळा भागातील सदगुरुनगर, सिध्दीविनायक काॅलनी परिसरातील सहा नवीन बेकायदा चाळी, चाळींच्या उभारणीसाठी उभारलेले ५२ जोते जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त केले. पोलीस, ठेकेदाराचे कामगार, पालिकेचे अधीक्षक, वरिष्ठ लिपिक या कारवाईत सहभागी होत आहेत.
ही कारवाई रोखण्यासाठी काही राजकीय मंडळी विविध माध्यमातून दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या आदेशावरून ही कारवाई सुरू असल्याने साहाय्यक आयुक्त पाटील कोणाच्या दबावाला बळी न पडता आक्रमकपणे ही तोडकामाची कारवाई करत आहेत. मागील आठ दिवसांपासून सलग सुरू असलेल्या या बेकायदा बांधकामांच्या विरुध्दच्या कारवाईने टिटवाळा, मांडा, नवीन गृहसंकुलातील रहिवासी समाधान व्यक्त करत आहेत. या कारवाईमुळे नैसर्गिक नाले, प्रवाहांचे बंद केलेले मार्ग सुरू करण्यात आले आहेत. माळरानावरील वनराई तोडून सरकारी, खासगी जमिनीवर ही बेकायदा बांधकामे करण्यात आली आहेत.