कल्याण – टिटवाळा बल्याणी भागातील आणि डोंगरवाली मैय्या मंदिर परिसरातील बेकायदा चाळी आणि चाळींच्या उभारणीसाठी बांधलेली ६० चाळी, जोती कल्याण डोंबिवली पालिकेच्या अ प्रभागाच्या तोडकाम पथकाने मंगळवारी जेसीबीच्या साहाय्याने उदध्वस्त केली.
अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांना बल्याणी भागात चोरूनलपून बेकायदा चाळींचे बांधकाम सुरू असल्याची माहिती मिळाली. तसेच डोंगरवाली मैय्या मंदिर परिसरात, बल्याणी टेकडीवर आडबाजुला बेकायदा चाळींची उभारणी करण्यासाठी ६० हून जोती बांधण्यात आल्याची माहिती मिळाली.
या माहितीची खात्री केल्यावर साहाय्यक आयुक्त पाटील यांनी मंगळवारी अधीक्षक, वरिष्ठ लिपिक, तोडकाम पथक, पोलीस बंदोबस्त घेऊन बल्याणी टेकडी, डोंगरवाली मैय्या मंदिर भागातील बेकायदा चाळी, चाळींची उभारणी करण्यासाठी बांधलेली ६० जोती जेसीबीच्या साहाय्याने उदध्वस्त केली. अचानक झालेल्या या कारवाईने भूमाफियांची पळापळ झाली.
बल्याणी टेकडी परिसरात सरकारी, वन जमीन अधिक आहे. या जमिनीवर कब्जा करण्यासाठी भूमाफियांनी या भागात चाळी उभारणीसाठी जोत्यांची बांधकामे करून ठेवली होती. अशाप्रकारे जमीन हडप करण्याची मोठी स्पर्धा या भागात होती, अशी माहिती अधिकाऱ्यांना स्थानिकांनी दिली. टिटवाळा, मांडा, अटाळी, मोहने परिसरात एकही बेकायदा बांधकाम उभे राहणार नाही अशा पध्दतीचे नियोजन साहाय्यक आयुक्त पाटील यांनी केले आहे.
गेल्या दीड महिन्यापासून टिटवाळा परिसरात बेकायदा बांधकामांच्या विरुध्द जोरदार मोहीम सुूरू आहे. या मोहिमेच्या माध्यमातून सुमारे दीड हजाराहून अधिक बेकायदा चाळी, जोते, व्यापारी गाळे भुईसपाट करण्यात आले आहेत. टिटवाळ्याच्या इतिहासात प्रथमच अशाप्रकारची कारवाई होत असल्याचे स्थानिक रहिवासी सांगतात. बेकायदा बांधकामे करणारे बहुतांशी राजकीय मंडळींचे पाठीराखे आहेत. ही सर्व मंडळी आता गायब झाली आहेत.
बेकायदा बांधकाम तोडताना कोणी हस्तक्षेप केला की त्याच्यावर सरकारी कामात अडथळा आणि बांधकामधारकांवर एमआरटीपीचा गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी सुरू केली आहे.