लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे : इन्स्टाग्राम या समाजमाध्यमाद्वारे अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या बदलापूरमधील तरूणाला ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. ऋषभ भालेराव (२८) असे त्याचे नाव असून त्याच्याकडून ६० किलो ५०० ग्रॅम गांजा, २९० ग्रॅम चरस आणि १९ बाटल्या चरस तेल जप्त केले. चरस तेल हे सिगारेट सेवन करताना वापरले जाते. त्यामध्ये नशेचे प्रमाण अधिक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
वागळे इस्टेट येथील इंदिरानगर परिसरात एकजण अमली पदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखा युनीट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे, पोलिसांच्या पथकाने सापळा रचून ऋषभ भालेराव याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे तीन किलो २०० ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला.
आणखी वाचा-ठाण्यात आशा स्वयंसेविकांच्या मोर्चामुळे वाहतूक कोंडी
तपासादरम्यान त्याच्या घरामध्ये मोठ्याप्रमाणात अमली पदार्थ असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या घरातून ६० किलो ५०० ग्रॅम गांजा, २९० ग्रॅम चरस आणि १९ बाटल्या चरस तेल जप्त केले. ऋषभ हा अमली पदार्थ इन्स्टाग्रामच्या माध्यमातून विक्री करत होता. अमली पदार्थांचे पैसे मिळाल्यानंतर ते घरपोच पाठविले जात होते. त्याने इतक्या मोठ्याप्रमाणात अमली पदार्थ कुठून आणले याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
चरस तेल हे सिगारेट सेवनादरम्यान वापरले जाते. तसेच हुक्कामध्ये चरस तेलाचे थेंब टाकले जातात. या पदार्थामध्ये नशेचे प्रमाण अधिक असते.