कल्याण – कल्याणमधील एका २९ वर्षाच्या नोकरदार तरुणीला लग्न करण्याचे आमिष दाखवून ठाण्यातील हिरानंदानी गृहसंकुलात राहणाऱ्या एका तरुणाने ५९ लाख ५६ हजार रुपयांचा गंडा घातला आहे. गेल्या वर्षभराच्या कालावधीत हा तरुण या तरुणीला आपण विवाह करू, अशी आमिषे दाखवून तिला कर्ज घेण्यास सांगून तिच्याकडून रकमा घेत होता. वर्ष होत आले तरी तरुण आपल्याबरोबर विवाह करत नाही. मात्र सतत पैशाचा तगादा लावत असल्याने, या तरुणीने खडकपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार केली आहे. कुणाल संतोष पाटील (रा. हिरानंंदानी, ठाणे) असे आरोपीचे नाव आहे. जुलै २०२३ ते आजपर्यंतच्या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे.
तरुणी कल्याण पश्चिमेतील एका उच्चभ्रूंची वस्ती असलेल्या गृहसंकुलात राहते. ही तरुणी नोकरदार आहे. लग्न करायचे असल्याने तिने विविध वधू-वर सूचक मंडळांमध्ये सुस्वरुप तरुणाची चौकशी सुरू केली आहे. वधू वर सूचकच्या एका उपयोजनच्या माध्यमातून या तरुणीची ओळख गेल्या वर्षी जुलैमध्ये आरोपी कुणाल पाटील याच्या बरोबर झाली.
हेही वाचा – फलकांचे भय कायम, ठाण्यात कापूरबावडी नाक्यावर जाहिरातीचे सर्वाधिक लोखंडी सांगाडे
कुणालने तरुणीबरोबर लग्न करायची तयारी दर्शवली. लवकरच लग्न करू, असे आश्वासन दिले. दरम्यानच्या काळात कुणाल पाटील याने विविध कारणे देऊन तरुणीकडून पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली. लग्न होणार असल्याने तरुणीने स्वत:च्या क्रेडिट कार्ड, आई-वडिलांच्या नावे, मित्र, मैत्रिणींच्या नावे विविध बँकांमधून कर्जाऊ रकमा घेऊन ते पैसे होणारा पती कुणाल पाटील यास दिले. या कर्जाऊ रकमेचे सर्व हप्ते आपण स्वत: फेडू, असे आश्वासन कुणालने पीडित तरुणीला दिले होते. त्यामुळे तरुणी निश्चिंत होती. अशाप्रकारे कुणालने तरुणीकडून वर्षभराच्या कालावधीत ५९ लाख ५६ हजार रुपये उकळले. तरुणीने हे पैसे कुणालला ऑनलाईन माध्यमातून त्याच्या बँकेत पाठविले होते.
हेही वाचा – अंबरनाथ पालिका म्हणते वालधुनी नदी नव्हेच ! बांधकाम प्रकरणात स्पष्टोक्ती
घेतलेल्या कर्जाऊ रकमांचे हप्ते सुरू झाले. त्याच्यावरील व्याज वाढत चालले म्हणून तरुणीने या रकमा भरण्याची गळ कुणाल पाटीलला घातली. त्यावेळी विविध कारणे देऊन या रकमा भरण्यास टाळाटाळ करू लागला. तरुणीने त्याला आपण लग्न कधी करायचे असे प्रश्न करणे सुरू केले. त्यावरही कुणाल टंंगळमंंगळ करू लागला. नंतर कुणालने पीडित तरुणीच्या संपर्काला प्रतिसाद देणे बंद केले. कर्ज देणारी मित्र, मंडळी दारात येऊ लागली. वाद वाढू लागले. अखेर कुणालने लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केली आहे, हे लक्षात आल्यावर तरुणीने बुधवारी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलीस उपनिरीक्षक प्रकाश मुकादम या प्रकरणाचा तपास करत आहेत.