कल्याण – कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी किल्ला रेतीबंदर ते गंधारे पूल दरम्यान खाडीतून बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर सोमवारी दुपारी कल्याणच्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी अचानक कारवाई केली. या कारवाईत वाळू माफियांची ६० लाखाची सामग्री खाडी किनारी जाळून नष्ट करण्यात आली.
दुर्गाडी किल्ला रेतीबंदर ते गंंधारे पूल दरम्यान दिवसा, रात्रीच्या वेळेत अनेक वाळू माफिया सक्शन पंप, बोटींच्या साहाय्याने वाळू उपसा करत आहेत. वाळूसाठी ते खाडी किनाऱ्याचा भाग धारदार यंत्राने कापून काढून परिसरातील लागवडीच्या शेतीला बाधित करत आहेत. या सततच्या वाळू उपशामुळे पावसाळ्यात नदी पात्रातील पाणी परिसरातील गावे, शेतीत येऊन भात शेती, भाजीपाल्याची शेती नापिक होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत होती. या वाळू माफियांंनी शेतकऱ्यांनी रेतीबंदर, गंधारे भागात वाळू उपसा करण्यास मज्जाव केला होता. दहशतीचा अवलंब करून माफिया त्यांना दाद देत नव्हते.या वाळू उपशाविषयी कल्याणचे तहसीलदार सचिन शेजाळ यांच्याकडे कल्याण परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. बेकायदा वाळू उपशामुळे या भागातील खारफुटीचे जंगल, खाडी किनारची झाडेझुडपे, जैवविविधता वाळू माफियांकडून नष्ट केले जात होते. या वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेत तहसीलदार सचिन शेजाळ यांनी नडगाव, कल्याणचे मंडळ अधिकारी दीपक गायकवाड यांना गंधारे, रेतीबंदर भागातील वाळू माफियांंवर कारवाई करण्याचे आदेश दिले.
तहसीलदार शेजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाचे अधिकारी रेतीबंदर ते गंधारे खाडी किनारी जाताच, खाडीत बेकायदा वाळू उपसा करत असलेले वाळू माफिया पडाव, बार्जवरून पाण्यात उड्या मारून महसूल अधिकारी उभे असलेल्या विरूध्द दिशेने पळून गेले. मंडळ अधिकारी गायकवाड आणि पथकाने खाडीतील वाळू उपसा करणाऱ्या बोटी, बार्ज, पडाव खेचकाम यंत्राने खाडी किनारी खेचून आणले. या वाळू उपशा साधनांचा वाळू माफियांना पुन्हा वापर करता येणार नाही अशा पध्दतीने ही सामग्री तोडून टाकण्यात आली. काही सामग्री तोडून बुडविण्यात आली. तर काही सामग्री जाळून टाकण्यात आली.या कारवाईत माफियांची ६० लाखाची सामग्री नष्ट केली, असे कल्याणचे मंडळ अधिकारी दीपक गायकवाड यांनी सांगितले.
कल्याण महसूल हद्दीत खाडी भागात बेकायदा वाळू उपसा करणाऱ्यांवर नियमित कारवाई केली जाते. रेतीबंदर, गंधारे खाडी भागात वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी स्थानिकांकडून करण्यात येत होत्या. या भागातील वाळू उपसा करणाऱ्यांची वाळू उपशाची सामग्री जप्त करून नष्ट करण्यात आली. – सचिन शेजाळ, तहसीलदार, कल्याण.