कल्याण : टिटवाळा येथे एका गृहसंकुलाच्या परिसरात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास भटक्या श्वानांनी केलेल्या हल्ल्यात एक साठ वर्षाची महिला गंभीर जखमी झाली. या महिलेची प्रकृती चिंताजनक झाल्याने तिला मुंबईतील जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या महिलेची ओळख पटलेली नाही. ही महिला भिक्षेकरी किंवा कचरा वेचक असण्याची शक्यता प्रत्यक्षदर्शींकडून व्यक्त केली जात आहे. टिटवाळ्यातील रिजन्सी सर्वम गृहसंकुलाच्या मागील बाजुस शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास ६० वर्षाची एक महिला पायी चालली होती. या महिलेला पाहून या भागातील चार भटके श्वान तिच्या अंगावर धाऊन आले. चारही श्वानांनी एकावेळी या महिलेवर हल्ला केल्याने महिला जमिनीवर कोसळली. भटक्या श्वानांनी महिलेचे कपडे, तिच्या शरीराला चावे घेऊन तिला घायाळ केले. या महिलेने सुरूवातीला भटक्या श्वानांच्या तावडीतून सुटण्यासाठी प्रयत्न केले. एकचवेळी चारही श्वान आक्रमकपणे महिलेवर हल्ला करत असल्याने तिला उठणे शक्य झाले नाही.
हेही वाचा…रत्नागिरी : गुहागरात पर्यटकांच्या टेम्पो ट्रॅव्हल्सला अपघात; कल्याण डोंबिवलीतील सतरा पर्यटक जखमी
या हल्ल्यात गंंभीर जखमी झालेली महिला घटनास्थळीच बेशुध्द झाली. भटक्या श्वानांनी या महिलेला ओढत गृहसंकुलाच्या दिशेने नेले. महिलेची श्वानांशी प्रतिकार करण्याची शक्यती संपल्याने ती निपचित पडून होती. परिसरातील काही रहिवाशांना, गृहसंकुलाच्या रखवालदारांना या घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी धाऊन आले. त्यावेळी श्वानांनी त्या महिलेला सोडून पळ काढला. जागरूक नागरिकांनी तातडीने या महिलेला रुग्णवाहिकेकडून गोवेली येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.
हेही वाचा…कल्याणमध्ये रेल्वेत नोकरीच्या आमिषाने बेरोजगारांची ७४ लाखांची फसवणूक
या महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने तिच्यावर गोवेली रुग्णालयात प्राथमिक उपचार करून उल्हासनगर येथील मध्यवर्ति रुग्णालय, तेथून कळवा येथील शासकीय रूग्णालय येथे पाठविण्यात आले. या महिलेची प्रकृती चिंताजनक झाल्याने तिला मुंबईतील जे. जे. रुग्णालयात अधिकच्या उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.टिटवाळात श्वानांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर गोवेली शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना अधिकच्या उपचारासाठी जे. जे. रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. साठ वर्ष वयाच्या या महिलेची ओळख पटलेली नाही. डाॅ. दीपलक्ष्मी कांबळे वैद्यकीय अधिकारी, गोवेली शासकीय रुग्णालय. कल्याण.