गेल्या आठ दिवसात झालेल्या संततधार पावसामुळे बारवी धरणक्षेत्रात ६०० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे गेल्या आठवडाभरात धरणात ६३ दशलक्ष घनमीटर पाण्याची भर पडली आहे. आठवडाभरापूर्वी असलेला ३७ टक्क्यांचा पाणीसाठा गुरूवारी ५५ टक्क्यांवर पोहोचला होता. आतापर्यंत बारवी धरणक्षेत्रात ९९० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यातील सुमारे ६०० मिलीमीटर पाऊस या आठ दिवसात पडला आहे.

ठाणे जिल्ह्यातील शहरे आणि ग्रामीण भागातील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रमुख स्त्रोत असलेल्या बारवी धरणाचा पाणीसाठा दोन वर्षानंतर ३० टक्क्यांपर्यंत खालावला होता. जून महिन्यात पावसाने दशकातील निचांक नोंदवला. त्यामुळे जुलै महिन्यात पाऊस पडला नसता तर पाणी कपातीचे संकट जिल्ह्यावर होते.

उल्हास नदीच्या पाणीपातळीत घट; नदी किनारच्या नागरिकांना दिलासा

बारवी धरणातून ठाणे, मिरा भाईंदर, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ या शहरांना, अनेक गावांना पाणी पुरवठा होतो. तर अंबरनाथ, डोंबिवली, ठाणे टीटीसी, वागळे इस्टेट या औदयोगिक वसाहतींनी या धरणातून पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरणे आवश्यक आहे. या पूर्ण क्षमतेवरच ही शहरे आणि औद्योगिक वसाहतींचे नियोजन केले जाते. मात्र जून महिन्या अखेरीस अवघा ३० टक्के पाणी साठा आणि पावसाची ओढ यामुळे हे नियोजन बिघडण्याची भीती व्यक्त होत होती. मात्र जुलै महिन्याच्या दोन आठवड्यात झालेल्या पावसाने सावरले आहे. त्यातही गेल्या आठ दिवसात झालेल्या संततधार पावसामुळे बारवी धरणात मोठा पाणीसाठा झाला आहे. त्यानंतर सततच्या पावसामुळे आठवडाभरात पाणीसाठा ५५ टक्क्यांवर पोहोचला. गुरूवार, १४ जुलै रोजी बारवी धरणात १८८.२७ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा आहे. गेल्या आठवडाभरात बारवी धरणात तब्बल ६२.६३ दशलक्ष घनमीटर पाण्याची भर पडली आहे. त्यामुळे धरणात १८.५६ टक्क्यांची वाढ झाली आहे.