कल्याण: कल्याण डोंबिवली पालिकेच्या पर्यावरण आणि प्रदूषण नियंत्रण विभागाने शहराच्या विविध भागात एकूण ६४ विद्युत चार्जिंग केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, शहाड येथे खासगी वाहनांसाठी प्रशस्त चार्जिंग हब उभे करण्याचा प्रशासनाचा विचार आहे. पालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या विद्युत बसगाड्यांकरिता चार्जिंगची व्यवस्था निर्माण व्हावी तसेच पालिका हद्दीत विद्युत वाहनांचा वापर वाढावा या उद्देशातून पालिकेने हा निर्णय घेतला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

येत्या दोन वर्षात शहरे प्रदूषण मुक्त करण्याचे केंद्र शासनाचे राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्थांना आदेश आहेत. पर्यावरणपूरक अत्यावश्यक साधने वापरण्यावर शासनाचा येत्या काळात भर असेल. या आदेशाप्रमाणे कल्याण डोंबिवली पालिका प्रदूषण नियंत्रण आणि पर्यावरण संवर्धन विभागाने प्रदूषण मुक्त शहरांचा विचार करून प्रभावी उपाययोजनांचे प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू केले आहे. येत्या काळात कल्याण डोंबिवली परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात एकूण २५० विद्युत बस येणार आहेत. पैकी १० बस ताफ्यात दाखल झाल्या आहेत. या वाहनांसाठी मुबलक चार्जिंग केंद्रे परिवहन आगारांसह शहराच्या विविध भागात सुरू करणे आवश्यक आहे. पुरेशा चार्जिंग केंद्राअभावी विद्युत बस अधिक संख्येने प्रवासी वाहतुकीसाठी सोडणे अवघड होणार आहे. त्यामुळे पालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ६४ चार्जिंग केंद्र उभारण्याचे नियोजन केले जात आहे.

हेही वाचा… बेकायदा जाहिरातबाजी केल्यास होणार गुन्हे दाखल; महापालिका क्षेत्रात दर बुधवारी फलक सफाई मोहीम

कल्याणमध्ये मुरबाड रस्त्यावरील गणेशघाट आगार, वसंत व्हॅली, डोंंबिवलीत खंबाळपाडा आगार याठिकाणी परिवहन बससाठी चार्जिंग केंद्र उभारली जाणार आहेत. प्रवासी वाहतुकीच्या बसचा चार्जिंग अभावी खोळंबा होऊ नये, शहरातील वातावरण प्रदूषण मुक्त असावे. नागरिकांचा विद्युत वाहनांच्या वापराकडे कल वाढावा, त्यांच्यात जागृती व्हावी, या विचारातून ही केंद्रे उभारली जात आहेत, असे कार्यकारी अभियंता लोकरे यांनी सांगितले. अनेक ठिकाणी खासगी चार्जिंग केंद्रावर वाहन भारीत (चार्ज) करताना एक ते दीड तास लागतो. पालिका प्रस्तावित केंद्रावर ही प्रक्रिया अर्धा ते पाऊण तासात होईल असे नियोजन आहे.

शहाड येथे हब

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत विद्युत वाहनांचा वापर वाढावा. विद्युत वाहनांना चार्जिंग संपले तर तात्काळ चार्जिंग करता यावे या दृष्टीने पालिकेने शहाड येथे शापुरजी पालनजी इमारतीच्या बाजुला बिर्ला संकुलात पालिकेला सर्व समावेशक आरक्षणाने मिळालेल्या जागेत खासगी वाहनांसाठी चार्जिंग केंद्र उभे करण्याचे नियोजन केले आहे. याठिकाणी सुरूवातीला दहा, त्यानंतर टप्प्याने एकूण ६० चार्जिंग केंद्रे सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. खासगी वाहन चालकांना तात्काळ विद्युत वाहन चार्ज करून मिळावे हा हे हब सुरू करण्यामागील मुख्य उद्देश आहे, असे एका परिवहन अधिकाऱ्याने सांगितले.

“ प्रदूषण मुक्त शहर ही संकल्पना प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यासाठी कल्याण-़डोंबिवलीत परिवहन बससह खासगी विद्युत वाहनांचा वापर वाढावा. अशा वाहनांना तात्काळ चार्जिंंग करता यावे या विचारातून चार्जिंंग केंद्रे उभारण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.” – रोहिणी लोकरे, कार्यकारी अभियंता, प्रदूषण व पर्यावरण विभाग, कडोंमपा.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 64 electric charging stations in different parts of kalyan dombivli spacious charging hub for private vehicles at shahad dvr