‘गुढीपाडवा-शाळेचा पट वाढवा’ या उपक्रमांतर्गत कल्याण डोंबिवली पालिकेच्या शाळांमध्ये ६४२ शाळाबाह्य मुलांना प्रवेश देण्यात आला. शालेय साहित्य देऊन या विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत करण्यात आले.दोन वर्षापासून चैत्र पाडव्याला कल्याण डोंबिवली पालिका शिक्षण विभागातर्फे ‘गुढीपाडवा-शालेय पट वाढवा’ उपक्रम राबविला जातो. या उपक्रमांतर्गत आपल्या कुटुंबासह विविध भागातून नोकरदार, कष्टकरी, मजुर मुलांची मुले शहराच्या विविध भागात येऊन राहतात. अशा मुलांना ती राहत असलेल्या भागातील पालिकेच्या शाळेत प्रवेश देऊन त्याचा नियमित अभ्यास होईल याचे नियोजन केले जाते, अशी माहिती शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी विजय सरकटे यांनी दिली.
हेही वाचा >>>कल्याण: आयुक्त दांगडेंच्या भूमिकेवरुन बेकायदा बांधकामांना बळ?
कल्याण पूर्वेतील तिसगाव येथील शाळेत १९ विद्यार्थी, पालिकेच्या इतर ५९ शाळांमधून शाळाबाह्य विद्यार्थ्यांची प्रवेशपत्र भरुन घेण्यात आली. एकाच दिवशी ६४२ विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला. या विद्यार्थ्यांचा मागील अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे नियोजन केले जाईल, असे सरकटे यांनी सांगितले.शिक्षण विभागाच्या उपायुक्त स्वाती देशपांडे, प्रशासनाधिकारी सरकटे, ड प्रभागाचे साहाय्यक आयुक्त चंद्रकांत जगताप, सर्व शिक्षा अभियानाच्या कार्यक्रम अधिकारी अर्चना जाधव यांच्या उपस्थितीत शाळा बाह्य मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. या मुलांच्या पालकांमध्ये शाळा, अभ्यासाविषयी आत्मियता वाढावी या उद्देशातून कार्यक्रम करण्यात आला.कल्याण पूर्व भागातील जरीमरी माता प्राथमिक विद्यालय तिसगाव येथे हा कार्यक्रम घेण्यात आला. विविध सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केले.