ठाणे : अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतींचे सरपंच, पंचायत समितीचे माजी सभापती, लोकप्रतिनिधी तसेच काही महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. ठाण्यातील एका सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. या पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने सर्वच राजकीय पक्षांना धक्का देत शिंदेच्या सेनेने जिल्ह्यात आपली ताकद वाढविल्याचे चित्र दिसून येत आहे.

c. राज्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात एकूण १६८ ग्रामपंचायती आहेत. त्यातील ६५ ग्रामपंचायतीचे सरपंच, पंचायत समितीचे माजी सभापती, लोकप्रतिनिधी, दुध संघाचे पदाधिकारी आणि विविध पक्षांचे पदाधिकारी या सर्वांनी शिंदेच्या शिवसेनेत शनिवारी जाहीर प्रवेश केला. शिवसेनेचे सचिव राम रेपाळे, जिल्हाप्रमुख कमलाकर कोते, पंचायत समितीचे माजी सभापती मारुती मेंगळे यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी पक्ष प्रवेश केला. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या जनकल्याणकारी आणि नागरी विकास कार्यपद्धतीने प्रभावीत होऊन हा पक्ष प्रवेश झाला आहे. या पक्ष प्रवेशादरम्यान, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी उपस्थितांशी संवाद साधत जनता आणि कार्यकर्ते हे माझे टाॅनिक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

पक्षात कार्यकर्त्याला पुढे जाण्याची संधी

विविध कार्यक्रमानिमित्ताने दररोज खूप प्रवास होत आहे. पण, इतक्या प्रवासानंतर कार्यकर्ते भेटल्यावर उर्जा आणि प्रेरणा मिळते. कारण, जनता आणि कार्यकर्ते हे माझे टाॅनिक आहे. आपल्या पक्षात कुणीही मालक नाही आणि नोकरही नाही. हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. जो कार्यकर्ता काम करेल, तो पुढे जाईल, हेच खासदार श्रीकांत शिंदे यांनी आधीच सांगितले आहे. त्यामुळे आपल्या पक्षात कार्यकर्त्याला पुढे जाण्याची संधी आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. मी डाॅक्टर नसलो तरी आतापर्यंत छोटी-मोठ्या शस्त्रक्रीया केल्या आहेत, असे सांगत जे आरोप करणाऱ्यांनी १०० जागा लढवून २० जागा जिंकल्या, असा टोलाही त्यांनी लगावला. मी मदत करताना कधी हिशोब ठेवत नाही आणि जे बोलतो, ते पुर्ण करतो. राज्यात विकासाचे राजकारण करायचे आहे. आमचा खुर्ची मिळवण्याचा अजेंडा नाही. सत्तेचा मोह न ठेवता आम्ही काम करतोय. संकट काळातच उभे रहायचे, हे बाळासाहेब सांगायचे, असेही ते म्हणाले.