ठाणे : हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सैफ अली खान यांच्यावरील हल्लेखोर हा बांगलादेशी असल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर आता घुसखोर बांगलादेशींचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ठाणे पोलिसांनी मागील वर्षभरामध्ये केलेल्या कारवाईत ६७ बांगलादेशींना अटक केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सैफ अली खानच्या प्रकरणानंतर आता कंपन्यांमधील स्वच्छता कामगार, बांधकाम विभागातील कामगार तसेच इतर क्षेत्रातील मजूरांची पोलीस मोठ्याप्रमाणात तपासणी करू लागले आहेत. भिवंडी शहरात सर्वाधिक बांगलादेशी आढळत असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले.

हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सैफ अली खान यांच्यावरील हल्लेखोराला घोडबंदर येथील हिरानंदानी इस्टेट भागातील कांदळवनामधून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. हा हल्लेखोर बांगलादेशी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता ठाणे जिल्ह्यात घुसखोर बांगलादेशींचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

हेही वाचा…तानसा अभयारण्यात पक्षी गणना, ७५ पक्ष्यांची नोंद

ठाणे आयुक्तालय क्षेत्रात अर्थात ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी या भागात ठाणे पोलिसांनी कारवाई करण्यास सुरूवात केली होती. डिसेंबर २०२४ मध्ये विविध संघटनांनी बांगलादेशींच्या मुद्द्यावरून देशभरात कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर बांगलादेशींविरोधातील कारवाईला वेग आला होता. १ जानेवारी २०२४ ते या वर्षीच्या १५ जानेवारीपर्यंतच्या कालावधीत घुसखोर बांगलादेशींविरोधात ३३ गुन्हे दाखल झाले असून यात ६७ जणांना अटक झाली आहे. डिसेंबरमध्ये ही कारवाई अधिक मोठ्याप्रमाणात झाली होती. हे बांगलादेशी घुसखोर प्रामुख्याने मजूरी, बांधकाम, यंत्रमाग कामे करतात. तर काही महिला या वेश्या व्यवसाय, ऑर्क्रेस्ट्रामध्ये काम करत असल्याचे आढळून आले आहे. कंपन्यांमध्ये स्वच्छता क्षेत्रामध्येही बांगलादेशींचे प्रमाण अधिक आहे. आता त्या दृष्टीनेही पोलिसांकडून तपास सुरू झाला आहे.

बांगलादेशींना अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले जाते. त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल होता. बांगलादेशींना त्यांच्या मायदेशी पाठविण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर त्या बांगलादेशींना भारतीय सीमेपर्यंत सोडले जाते. तेथून बांगलादेशी अधिकाऱ्यांच्या ताब्यात त्यांना दिले जाते. बांगलादेशींनी घुसखोरी केल्यास त्यांना बनावट कागदपत्रे बनवून देणाऱ्या टोळ्या आहेत. या टोळ्या बनावट कागदपत्रांच्या आधारे त्यांचे आधारकार्ड बनवितात. आधारकार्ड कोणत्या कागदपत्रांच्या आधारे बनविले त्याच्या तपासासाठी मुंबई उच्च न्यायालयाकडे अर्ज करावा लागतो. त्यानंतर ‘युआयडीएआय’कडून त्या व्यक्तीचे आधारकार्ड कसे बनले जाते याची माहिती घेतली जाते असे सुत्रांनी सांगितले.

हेही वाचा…ठाण्यात टाकाऊ वस्तुंपासून पालिकेने बनविल्या कलाकृती, पुर्नवापरचा संदेश देण्यासाठी पालिकेचा उपक्रम

ठाणे पोलिसांकडून घुसखोर बांगलादेशींविरोधात कारवाई केली जाते. ही कारवाई यापुढीही सुरूच राहील. घुसखोर बांगलादेशींची तपासणी सुरू आहे. – आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे पोलीस.

Story img Loader