डोंबिवली- येथील सर्वाधिक वर्दळीच्या मानपाडा रस्त्यावरील गावदेवी मंदिरा जवळील सात माळ्याच्या बेकायदा इमारतीवर पालिका प्रशासनाने गुरुवारी आक्रमक कारवाई केली. ही इमारत तोडण्यास राजकीय दबाव असताना प्रशासनाने तो दबाव झुगारुन कारवाई केली. त्यामुळे अधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. अशाच प्रकारे शहरातील इतर बेकायदा इमारती अधिकारी आणि पोलिसांनी संघटितपणे जमीनदोस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून भूमाफियांनी पालिकेच्या परवानग्या न घेता सात माळ्याच्या बेकायदा इमारतीची मानपाडा रस्त्यावरील गावदेवी मंदिराजवळ उभारणी केली. राजकीय आशीर्वादाने या इमारतीची उभारणी झाल्याने या बेकायदा इमारतीवर कारवाई करताना पालिकेला अनेक अडथळे आले. हिवाळी अधिवेशनात आमदार प्रमोद पाटील यांच्यासह इतर आमदारांनी वर्दळीच्या रस्त्यात सुरू असलेल्या बेकायदा इमारतीविषयी प्रश्न उपस्थित केले. या इमारतीवर कारवाई करण्याचे आश्वासन शासनाने दिले होते.
हेही वाचा >>> कल्याणमध्ये मेट्रो माॅलजवळ गॅस सिलिंडरचा ट्रक उलटला
राजकीय हस्तक्षेपामुळे या बेकायदा इमारतीवर कारवाई होण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे वास्तुविशारद संदीप पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. प्रशासनाने त्यानंतर या इमारतीवर कारवाईचा देखावा केला. चालू विधीमंडळ अधिवेशनात या बेकायदा इमारतीचा विषय उपस्थित झाला. पुढील आठवड्यात या इमारतीचा विषय न्यायालयात सुनावणीसाठी येणार आहे. न्यायालयाकडून काही आदेश किंवा खडेबोल प्रशासनाला सुनावले जाण्याची भीती असल्याने त्यापासून बचावासाठी प्रशासनाने गुरुवारी मुसळधार पाऊस असताना गावदेवी मंदिराजवळील बेकायदा इमारतीवर कारवाई केली.
आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली फ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त चंद्रकांत जगताप यांच्यासह ई प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भारत पवार, ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त सुहास गुप्ते, आय प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर, ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजय कुमावत यांनी ही कारवाई केली. ५० हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त होता.
हेही वाचा >>> मुंबई, ठाण्यात कोसळधार; पावसाचा दिवसभर मुक्काम, आजही अतिवृष्टीचा इशारा
या कारवाईत इमारतीच्या आतील १५० स्लॅब तोडण्यात आले. सज्जे तोडण्यात आले आहेत. इमारतीवर कारवाई होण्यापूर्वीच एका लोकप्रतिनिधीने तक्रारदार, आयुक्तांना संपर्क करुन कारवाई न करण्याची मागणी केली. आतापर्यंत आडबाजुला बेकायदा इमारती उभारणारे भूमाफिया शहराच्या मध्यवर्ति ठिकाणी वर्दळीच्या रस्त्यावर इमारत उभारत आहेत. तरीही प्रशासन काही करत नसल्याने नागरिकांमध्ये संताप आहे.
या बेकायदा इमारतीवर कारवाई होऊ नये म्हणून इमारतीच्या तळ मजल्यावरील गाळ्यांमध्ये गणपतीच्या मूर्ती माफियांी विक्रीसाठी आणून ठेवण्यात आल्या होत्या. त्या मूर्ती बाजुला सुरक्षित ठेवल्यानंतर इमारतीवर कारवाई करण्यात आली.
दरम्यान, भूमाफियांनी ही इमारत खासगी जमिनीवर उभारली आहे. तेथे आरक्षित जागा नाही. अशी भूमिका घेऊन न्यायालयात हे प्रकरण दाखल केले आहे. पालिकेने यापूर्वीच ही इमारत अधिकृत करण्याचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे.
“ गावदेवी मंदिरा जवळील बेकायदा इमारत प्रकरणी आपली उच्च न्यायालयात याचिका आहे. पालिका काय कारवाई करते यापेक्षा न्यायालयाकडून पालिकेला या इमारतीवर काय कारवाई केली याची विचारणा होणारच आहे. त्यावेळी आपली योग्य भूमिका तेथे मांडणार आहोत.” संदीप पाटील-वास्तुविशारद व याचिकाकतर्ते.