चित्रपटसृष्टीतील जुन्या सिनेकलाकारांच्या वेशभूषा परिधान करत ‘रेट्रो डे’च्या माध्यमातून ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी युतोपिया महोत्सवाचा प्रारंभ केला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी १९७०- ८० या दशकातील सिनेकलाकारांच्या आठवणींना उजाळा दिला. प्राचार्य सी. डी. मराठे यांच्या हस्ते समारंभाचे उद्घाटन करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी जुन्या चित्रपटातील सिनेकलाकारांसारख्या केशभूषा, वेशभूषा परिधान केल्या होत्या. सिनेकलाकार राजेश खन्ना, देवानंद ,मुमताज, वहिदा रहमान अशा कलाकारांच्या वेशभूषा करून विद्यार्थी महाविद्यालयात प्रवेश करत होते. नवीन चित्रपट आणि संगीतामध्ये रमणारी तरुण पिढी महाविद्यालयाच्या या रेट्रो डे दिवशी ‘जुने ते सोने’ असे म्हणत वावरताना पाहायला मिळाली. जुन्या काळातील अभिनेत्री ज्याप्रमाणे वेश परिधान करत असत, त्याचप्रमाणे काही विद्यार्थिनी साडी नेसून तर काही केसांना ओढणी बांधून महाविद्यालयीन आवारात दिसत होत्या. कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी यावेळी जुन्या चित्रपटातील काही गाणी, चित्रपटातील प्रसिद्ध संवाद तसेच अभिनयाचे सादरीकरण केले. युतोपिया महोत्सवाच्या प्रमुख प्रा. गुजर यांनी ‘साहेब, बिवी और गुलाम’’ चित्रपटातील गाण्यांचे सादरीकरण करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. विद्यार्थ्यांनी जुन्या गाण्यांवर नृत्य सादर केल्याने ज्ञानसाधना महाविद्यालयाचा रेट्रो दिवस विशेष आकर्षण ठरला.  या दिवशी टी-शर्ट पेंटिंग, पॉट पेंटिंग या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सेल्फीचे वेड या संकल्पनेवर आधारित टी- शर्ट पेंटिंग स्पर्धा विशेष लक्षवेधी ठरली.

 

Story img Loader