मोटारसायकलवर स्वार होत वेगाशी स्पर्धा करण्याचे वेड तरुणाईला असतेच. हल्लीची मुले त्यासाठी वेगवेगळ्या बाइकची खरेदी करताना आपल्याला दिसतात. मात्र डोंबिवलीतील मनाने तरुण असणाऱ्या विजय कुलकर्णी या ज्येष्ठ नागरिकाने वयाच्या सत्तरीत दुचाकीवरून हिमालयात भ्रंमती केली आहे. डोंबिवली-जम्मू-काश्मीर-लेह-लडाख ते पुन्हा डोंबिवली असा एकूण ६ हजार ६१९ किलोमीटरचा प्रवास त्यांनी मोटारसायकलवरून पूर्ण केला आहे. या प्रवासात त्यांनी जगातील सर्वात मोठय़ा पहिल्या दोन क्रमांकाचे व पाचव्या क्रमांकाचा घाटही पार केले आहेत.
डोंबिवलीतील म्हात्रेनगर परिसरातील अनुराग सोसायटीत राहणारे विजय कुलकर्णी हे पेशाने अभियंता आहेत. कांजुरमार्ग येथील ‘ब्राइट अॅण्ड ब्रदर्स’मध्ये उत्पादन व्यवस्थापक म्हणून ते कार्यरत होते. २००५ मध्ये निवृत्तीनंतर त्यांनी आपले लक्ष मोटारसायकल छंदाकडे केंद्रित केले. वयाच्या सत्तरीत मोटारसायकलवरून लांबचा प्रवास करणे तसे जोखमीचे काम होते. मात्र त्यांची पत्नी माधवी, मुलगा मनीष यांचा त्यांना भक्कम पाठिंबा आहे. घरातील पाठिंब्यामुळे विजय कुलकर्णी यांनी गेल्या वर्षी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली. यावर्षी त्यांनी ‘डोंबिवली लेह लडाख ते पुन्हा डोंबिवली’ असा प्रवास पूर्ण केला आहे.
जम्मू काश्मीर हे भारताचे मुकुट असून येथील माती कपाळाला लावायची हे स्वप्न होते, म्हणून हा प्रवास करण्याचे त्यांनी ठरविले. या प्रवासासाठी त्यांनी रॉयल एम्फिल्ड बुलेट क्लासिक ३५ चा वापर केला आहे. ५ जुलैला डोंबिवलीहून निघून ते सुरत, उदयपूर, अजमेर, फिरोजपूर, अमृतसर असा प्रवास करीत ११ जुलैला जम्मू येथे पोहोचले. तिथे मोटारसायकलवरून भ्रमंती केल्यानंतर २ ऑगस्ट रोजी ते पुन्हा डोंबिवलीत पोहोचले.
साहसी सफर, विलक्षण अनुभव
जम्मू येथून विजय कुलकर्णी यांच्या साहसी स्वारीला सुरुवात झाली. येथेच त्यांना कल्याण, डोंबिवली, मुंबई येथून आलेल्या बाईकस्वारांचा एक संघ भेटला. त्यांच्यासोबत त्यांनी पुढील प्रवासाची सुरुवात केली. आरएसपुरा बॉर्डर, पटणी टॉप, श्रीनगर, सोनबर्ग, जोझिला पास, पाकिस्तान हद्द, द्रास आणि टुरटूक या परिसराला भेट दिली. लेह येथील खाऱ्या पाण्याचे सरोवर पेनबॉंग यालाही त्यांनी भेट दिली. तिथे रात्रीचे तापमान उणे २ डिग्री सेल्सिअस होते. हा सगळा अनुभव त्यांना नवीन होता. लेहकडे जाताना जगातील सर्वात मोठा पहिल्या क्रमांकाचा १८ हजार ३८०फूटी खारडुंगला हा घाट त्यांनी मोटारसायकलवर पार केला. याआधी ६४ वर्षीय व्यक्तीने तो पार केला होता. त्यानंतर हा घाट पार करणारे हे दुसरे ज्येष्ठ नागरिक. यासोबतच त्यांनी दुसऱ्या क्रमांकाचा ‘चांग ला’ हा १७ हजार ६३० फुटी घाट पार केला.