केंद्र सरकारने आखलेल्या ‘जवाहरलाल नेहरू विकास योजने’च्या माध्यमातून कोटय़वधी रुपयांचा निधी पदरात पाडूनही विकासकामांच्या आघाडीवर मात्र संथगती कायम राखणाऱ्या ठाणे महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाला उशिरा का होईना जाग आली. वारंवार तंबी देऊनही कामास विलंब करणाऱ्या एका ठेकेदारास तब्बल ७५ लाख रुपयांचा दंड ठोठाविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्रातील कँाग्रेस आघाडी सरकारने आखलेल्या जवाहरलाल नेहरू विकास योजनेच्या माध्यमातून ठाणे, कळवा, मुंब्रा या शहरांतील जलवाहिन्या तसेच मलनिस्सारण वाहिन्या बदलण्याची कामे सुरू करण्यात आली आहेत. पालिकेच्या काळय़ा यादीत समाविष्ट करण्यात आलेल्या कळव्यातील एका ठेकेदारास हे काम देण्याचा निर्णय तत्कालीन आयुक्त असीम गुप्ता यांनी घेतला होता. त्यावरून वाद निर्माण झाला असतानाच कळवा, मुंब्रा येथील कामे रखडल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.  या दोन्ही शहरांमधील रस्ते अतिशय रुंद असून येथील धोकादायक इमारतींची संख्याही मोठी आहे. या वास्तवाची कल्पना असूनही महापालिकेने सरसकट रस्ते खोदून मलवाहिन्या टाकण्याची कंत्राटे देण्याचा निर्णय घेतला. या इमारतींना लागून मलवाहिन्या टाकताना मोठे खोदकाम करणे अनेक ठिकाणी जिकिरीचे बनल्याने ही कामे पूर्ण करून घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अरुंद गल्ल्यांमध्ये मोठय़ा वाहिन्या टाकताना होणारी अडचण लक्षात घेऊन महापालिकेने ट्रेन्चलेस पद्धतीने कामे करण्याचा निर्णय घेतला खरा, मात्र तोवर कामे पूर्ण करण्याची मुदत टळून गेली होती. मुंब्रा परिसरात मलउदंचन केंद्र तसेच मलप्रक्रिया केंद्र उभारण्याच्या कामास झालेली दिरंगाई काही प्रमाणात योग्य असली तरी ठेकेदाराच्या गैरव्यवस्थापनामुळेही हा उशीर झाल्याचा निष्कर्ष अभियांत्रिकी विभागाने काढला आहे. संबंधित ठेकेदारास वारंवार समज देऊनही कामे वेळेत पूर्ण झाली नसल्याचा ठपका देऊन सुमारे ७५ लाख रुपयांचा दंड ठोठाविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  
‘लोकसत्ता ठाणे’कर व्हा!
‘लोकसत्ता ठाणे’च्या माध्यमातून  शहरांतील समस्यांना वाचा फोडण्याचे काम वेळोवेळी करण्यात येते.  मात्र, तुम्हीही तुमच्या विभागातील समस्या सर्वासमोर मांडू शकता. ‘लोकमानस’ आणि ‘वाचक वार्ताहर’ यांच्या माध्यमातून तुमच्यासाठी व्यासपीठ खुले करण्यात आले आहे. तुमची मते, अपेक्षा, तक्रारी, अनुभव आम्हाला पाठवा. त्यांना या सदरांतून प्रसिद्धी दिली जाईल.
आमचा पत्ता : लोकसत्ता ठाणे, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, गोखले रोड, ठाणे (पश्चिम),
फॅक्स : ०२२-२५४५२९४२
ईमेल: newsthane@gmail.com

Story img Loader