८३ टक्के मद्यपी वाहनचालक २६ ते ३५ वयोगटातील; मद्यपी दुचाकीस्वारांची संख्या ८२ टक्क्यांच्या घरात
रस्त्यावरील अपघातांना पायबंद घालण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांकडून गेल्या काही महिन्यांपासून राबवण्यात येत असलेल्या मद्यपी वाहनचालक तपासणी मोहिमेच्या पाहणीनुसार दारू पिऊन गाडी चालवण्यात तरुण वर्ग आघाडीवर असल्याचे दिसून येते. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील ठाणे ते बदलापूपर्यंतच्या सर्व शहरांत आढळलेल्या मद्यपी चालकांमध्ये २६ ते ३५ वयोगटातील तरुणांची संख्या ५३ टक्के इतकी आढळली आहे. यामध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण ८२ टक्के इतके आहे. विशेष म्हणजे, मद्याचे प्रमाण ३० मिली किंवा त्यापेक्षा आढळल्यास चालकावर कारवाई करण्यात येते; परंतु पोलिसांच्या पाहणीनुसार तब्बल ४२ टक्के चालकांच्या शरीरात ३०० मिली ग्रॅमपेक्षा अधिक अल्कोहल आढळले आहे.
मद्याच्या नशेत असलेल्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात होण्याची शक्यता असते. अशा अपघातांमध्ये रस्त्यावरील अन्य वाहनचालक तसेच पादचाऱ्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो. या पाश्र्वभूमीवर ठाणे वाहतूक पोलिसांकडून गेल्या काही महिन्यांपासून मद्यपी चालकांविरोधात सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. घोडबंदर भागात टीएमटीच्या मद्यपी चालकामुळे वाहतूक शाखेतील एका पोलीस हवालदाराला प्राण गमावावे लागले होते. या घटनेनंतर ठाणे वाहतूक पोलिसांनी ही कारवाई अधिक प्रभावीपणे राबविण्यास सुरुवात केली आहे.
मार्च महिन्यातील कारवाईच्या आकडेवारीचे वाहतूक पोलिसांनी सविस्तर विश्लेषण केले असून त्यामधून धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मद्याच्या नशेत वाहन चालविताना पकडले गेलेल्या चालकांचा वयोगट, वाहनाचा प्रकार आणि शरीरात आढळलेल्या अल्कोहलचे प्रमाण अशा तीन भागांत आकडेवारीचे वर्गीकरण करण्यात आले आहे. १८ ते १५, २६ ते ३५, ३६ ते ५० आणि ५० हून अधिक अशा चार वयोगटांत मद्यपी चालकांची विभागणी करण्यात आली असून त्यामध्ये २६ ते ३५ वयोगटातील तरुणांची संख्या मोठी आहे. या तरुणांची टक्केवारी जवळपास ५३ टक्क्य़ांच्या घरात आहे. तसेच मद्याच्या नशेत वाहन चालविणाऱ्यांमध्ये दुचाकी चालक आघाडीवर असून त्यांचा आकडा सुमारे ८२ टक्के इतका आहे. त्याचप्रमाणे शरीरात ३०० मिलि ग्रॅमपर्यंत अल्कोहलचे प्रमाण ४२ टक्के इतके आहे.
असे असले तरी ३० मिलिग्रॅमपेक्षा अधिक मद्य प्राशन केलेल्या चालकाचे वाहनावर नियंत्रण राहत नाही आणि त्याच्याकडून अपघात होण्याची शक्यता अधिक असते, अशी माहिती ठाणे वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांनी दिली.