कल्याण – डोंबिवलीतील मोठागाव रेतीबंदर रेल्वे फाटकावर रेल्वेकडून बांधण्यात येणाऱ्या उड्डाण पुलाच्या पोहच रस्त्याने बाधित होणाऱ्या रेल्वे मार्गिकेच्या दुतर्फाच्या बाधितांच्या जमिनीचे भूसंपादन, पुनर्वसन आणि पुनर्स्थापना कामासाठी महसूल विभागाने योग्य मुल्यांकन करून ८४ कोटी १२ लाख ६८ हजार ५८८ रुपयांचा प्रारूप प्रस्ताव तयार केला आहे. महसूल विभाग आणि रेल्वे बोर्डाने हे प्रस्ताव अंतीम केल्यानंतर रस्ते बाधितांना मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

माणकोली उड्डाण पुलाकडून डोंबिवलीत येण्यासाठी मोठागाव स्मशानभूमी ते रेतीबंदर रेल्वे भागात पोहच रस्ता आणि रेतीबंदर रेल्वे फाटकावर उड्डाण पुलाचे काम प्रस्तावित आहे. रेल्वे मार्गावरील उड्डाण पूल बांधणीचे काम समर्पित जलदगती मालवाहू रेल्वे मंडळाकडून (डीएफसीसी) केले जाणार आहे. रेतीबंदर रेल्वे फाटकावर उड्डाण पुलाची उभारणी झाल्यानंतर पुलाच्या पूर्व आणि पश्चिम दिशेला पुलाचे पोहच उतार रस्ते असणार आहेत. या पोहच रस्त्यांच्या मार्गिकेत इमारती, व्यापारी गाळे, चाळी आहेत. या बाधितांना शासकीय मुल्यांकनाप्रमाणे भरपाई मिळाल्यानंतर त्यांच्या जमिनीचे भूसंपादन, त्यांची बांधकामे हटविणे पालिका प्रशासनाला शक्य होणार आहे.

हेही वाचा – डोंबिवलीत महावितरणच्या साहाय्यक अभियंत्याला जीवे ठार मारण्याची धमकी

कल्याण डोंबिवली पालिकेने रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजुच्या पोहच रस्त्यांसाठी भूसंपादन, त्या जमिनीचे मुल्यांकन याविषयी महसूल विभागाला कळविले आहे. महसूल विभागाने या भागातील काही जमिनीचे भुसंपादन केले आहे. अद्याप काही जमिनी, बांधकामे यांचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मुल्यांकन होणे बाकी आहे, असे महसूल विभागातील एका उच्चपदस्थाने सांगितले.

रेतीबंदर रेल्वे फाटकावरील पुलाच्या पोहच रस्त्यावरील बाधित बांधकामे, भूसंपादन, बाधितांची पुनर्स्थापना या सर्व प्रक्रियांसाठी महसूल विभागाने भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा अधिनियम २०१३ मधील कलम २३ अन्वये प्रारूप आराखडा तयार केला आहे. या आराखड्याप्रमाणे मौज नवागाव या महसुली हद्दीतील भूसंपादन, पुनर्वसन कामासाठी दोन कोटी ९२ लाख ५० हजार ५६० रुपये, मौजे ठाकुर्ली येथील भूसंपादन कामासाठी ८१ कोटी २० लाख १८ हजार २८ रूपये प्रस्तावित करण्यात आले आहेत.

भरपाईच्या निवड्याचा हा प्रारूप आराखडा कल्याणचे उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर यांच्याकडून ठाणे जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आला आहे. हा आराखडा कोकण विभागीय आयुक्तांकडून मंजुरीच्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, रेल्वे बोर्डाला महसूल विभागाकडून सादर केला जाईल. रेल्वे बोर्डाच्या मंजुरीनंतर प्रस्तावित रक्कम महसुल विभागाला उपलब्ध झाल्यानंतर बाधितांना भरपाई देऊन, मग भूसंपादन, पुनर्वसन या प्रक्रिया पार पाडल्या जातील, असे उच्चपदस्थ महसूल अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा – कल्याणमध्ये स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्याला पालिका आयुक्तांची नोटीस

मोठागाव रेतीबंदर रेल्वे फाटकावरील पुलाच्या पोहच रस्त्यांच्या कामासाठी भूसंपादनाची कामे सुरू आहेत. बहुतांशी भूसंपादन पूर्ण झाले आहे. तरी काही जमिनींवर बांधकामे आहेत. त्यांचे मूल्यांकन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होणे बाकी आहे. बाधितांच्या भरपाईचा एकत्रित प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडून मंजुर होऊन आल्यानंतर पुढील प्रक्रिया पार पाडल्या जातील. – विश्वास गुजर, उपविभागीय अधिकारी, कल्याण.

मोठागाव रेतीबंदर रेल्वे फाटकाच्या दोन्ही बाजुच्या पोहच रस्त्याच्या कामासाठी भूसंपादन, मुल्यांकन यासाठी महसूल विभागाला प्रस्ताव दिला आहे. या विभागाने याबाबतच्या बहुतांशी प्रक्रिया सुरू केल्या आहेत.- मनोज सांगळे, कार्यकारी अभियंता, कडोंमपा.