निखिल अहिरे, लोकसत्ता
ठाणे : शासकीय कार्यालये, गर्दीच्या सार्वजनिक ठिकाण परिसरात स्तनदा मातांना बालकांना स्तनपान देता यावे यासाठी ठाणे जिल्ह्यात मागील आठ महिन्यांच्या कालावधीत तब्बल ८७ हिरकणी कक्षांची उभारणी करण्यात आली आहे, तर येत्या काही दिवसांत आणखी २३ कक्ष उभारण्याची जिल्हा प्रशासनाकडून तयारी करण्यात येत आहे. सर्वाधिक कक्ष हे जिल्ह्यातील पोलीस स्थानकांमध्ये उभारण्यात आले आहेत. याच पद्धतीने ठाणेपलीकडील रेल्वे स्थानकांमध्ये कक्ष उभारण्यात यावे, अशी मागणी महिलांकडून करण्यात येत आहे.
राज्य शासनाच्या वतीने फेब्रुवारी महिन्यात ठाणे जिल्ह्यासाठी ६० हिरकणी कक्ष उभारण्यास मान्यता दिली होती. महिला व बाल विकास आयुक्तांनी तांत्रिक मान्यता आणि जिल्हा नियोजन समितीच्या वतीने स्थानिक प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. यातील पहिला हिरकणी कक्ष हा फेब्रुवारी महिन्यात ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षेत्रातील भिवंडी तालुक्यातील पडघा पोलीस स्थानकात उभारण्यात आला. यानंतर जिल्ह्यातील ठाणे, मीरा भाईंदर, नवी मुंबई तसेच ठाणे ग्रामीण या सर्व भागातील पोलीस ठाण्यांमध्ये हिरकणी कक्ष उभारण्यात आले. यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळत आहे.
हेही वाचा >>> ठाण्यात प्रदूषण नियंत्रणासाठी रस्ते पाण्याने धुण्याचे निर्देश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सुरुवातीला जिल्ह्यात ६० ठिकाणी हे कक्ष सुरू करण्यात आले होते. यानंतर प्रत्येक पोलीस स्थानक तसेच बस स्थानक आणि स्थानिक शासकीय कार्यालय प्रशासनाकडून या कक्षाची उभारणी करण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली. यानुसार सद्य:स्थितीत जिल्ह्यातील बहुतांश पोलीस ठाण्यांमध्ये हिरकणी कक्ष उभारण्यात आला आहे, तर सर्व पोलीस स्थानकांमध्ये कक्ष उभारण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. महिलांना उपयोगी असणाऱ्या या कक्षांची जिल्ह्यात व्याप्ती वाढताना दिसून येत आहे. सुरुवातीच्या काळात मंजूर झालेले ६० कक्ष पूर्ण झाले असून, त्यानंतर मंजूर करण्यात आलेल्या ५० कक्षांपैकी २७ कक्ष उभारण्यात आले आहेत. उर्वरित कक्ष उभारण्याचे काम सुरू असल्याची माहिती जिल्हा महिला बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी दिली.
रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा..
दैनंदिन कामानिमित्त उपनगरीय रेल्वे गाडय़ांनी विविध स्थानकांतून प्रवास करणाऱ्या महिलांना या कक्षाची स्थानकात प्रामुख्याने गरज आहे. यामुळे ठाणेपल्याड रेल्वे स्थानकांमध्ये असे कक्ष उभारण्यात यावे, अशी मागणी महिला वर्गाकडून करण्यात येत आहे, तर रेल्वे स्थानकांमध्ये कक्ष उभारण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू असून येत्या काही दिवसांत या ठिकाणीदेखील कक्ष उभारण्यात येतील, अशी माहिती जिल्हा महिला बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी दिली.
अनेक सुविधा उपलब्ध..
जिल्ह्यातील बस स्थानके, जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका आणि नगरपालिका, तहसील कार्यालय, जिल्हा आणि ग्रामीण रुग्णालये, महापालिका आणि पालिका अखत्यारीतील रुग्णालये, बस स्थानके, पोलीस स्थानक या ठिकाणी हे कक्ष उभारण्यात आले आहेत. या कक्षात पाणी पिण्याची व्यवस्था, बालकांसाठी खेळणी, मनोरंजनासाठी टीव्ही संच, एकाच वेळी दोन महिलांकरिता स्वतंत्र खाटा, जनरेटर, सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रामुख्याने सीसीटीव्ही कॅमेरे अशा सुविधा कक्षात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.