ग्राहकांकडे महावितरणची १४० कोटींची थकबाकी; वीजचोरीचे ५०० गुन्हे

कल्पेश भोईर, वसई

वीज ग्राहकांनी महावितरणाचे कोटय़वधी रुपये थकवले असून या वीज देयकांच्या वसुलीसाठी महावितरणाने कंबर कसली आहे. मागील महिन्याची ३० कोटी आणि चालू महिन्याचे १३० कोटी असे एकूण १४० कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट महावितरणापुढे आहे. वीज देयक थकबाकीदारांच्या ९ हजार वीजजोडण्या महावितरणाने खंडित केल्या आहेत, तर वीजचोरांविरोधात पाचशेहून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मार्च महिना सुरू असून महावितरण विभागाची वीज देयके वसुलीसाठी धावपळ सुरू झाली आहे. वसई, विरार, नालासोपारा, नायगाव, वाडा या परिसरात महावितरण कंपनीमार्फत वीज पुरवली जाते. यामध्ये आठ लाखांहून अधिक महावितरणचे वीजग्राहक आहेत. यंदाच्या वर्षांअखेर महावितरण कंपनीने जवळपास मोठय़ा प्रमाणात वीज देयके वसूल करण्यात आली आहेत. महावितरण कंपनीने २०१८-१९ या आर्थिक वर्षांत फेब्रुवारी २०१९ पर्यंत १ हजार ४५५ कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यानुसार १ हजार ४२५ कोटीची रुपये वसूल करण्यात आले आहेत. फेब्रुवारी महिन्यात ३० कोटी थकबाकी शिल्लक आहे, तसेच मार्च महिन्याचे ११० कोटीचे उद्दिष्ट असे मिळून १४० कोटी रुपयांची वसुली करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी महावितरण कामाला लागले असून सर्व विभागातील अभियंत्यांना वसुलीचे आदेश देण्यात आलेले आहेत.

महावितरणकडून कारवाईस सुरुवात

ज्यांची वीज देयके बाकी आहेत त्यांना ती भरण्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार त्यांच्या देयकांची रक्कम ऑनलाइन पद्धतीने मोबाइलच्या माध्यमातूनही पाठविण्यात आली आहे. ज्यांनी वीज देयके भरली नाहीत, अशा वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत ९ हजारांहून अधिक वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला असल्याची माहिती महावितरण विभागाने दिली आहे.

वीजचोरीचे प्रकार सुरूच..

वसई विरार भागात अनेक ठिकाणी छुप्या पद्धतीने वीजचोरी केली जाते. विद्युत खांबांवर आकडे टाकून, मीटरमध्ये कटआउट करून अशा पद्धतीने वीजचोरी केली जात असते. याचा फटका सर्वसामान्य ग्राहाकाला बसू लागला आहे. वीजचोरी थांबविण्यासाठी महावितरणने विशेष पथके तयार करण्यात आली असून धाडी टाकण्याचे काम सुरू आहे. वर्षभरात ५०० हून अधिक वीजचोरीचे प्रकार पकडण्यात आले असून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला आहे. ज्यांनी दंड भरला नाही अशा ५० हून अधिक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशी माहिती महावितरण विभागाने दिली आहे.

नवीन ग्राहकांमध्ये वाढ

शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार वीजग्राहकांची संख्याही वाढू लागली आहे. सुरुवातीला ८ लाख १४ हजार ७१६ वीजजोडण्या होत्या. आता त्यामध्ये भर पडली असून नव्याने ४० हजारांहून अधिक वीज ग्राहकांना वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत, तसेच ७ हजारांहून अधिक अर्ज वीजजोडणीसाठीचे प्रलंबित असल्याचे महावितरण विभागाने सांगितले आहे.

थकीत असलेली वीज देयके वसूल करण्याचे काम सुरू आहे. महावितरणचे जे काही उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, ते पूर्णपणे वसूल करण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्यांचे वीज देयक थकीत आहे, त्यांनाही वीज भरण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे, वीजग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी महावितरण विभागाकडून प्रयत्न सुरू आहे.

– दिनेश अग्रवाल, मुख्य अभियंता, महावितरण

Story img Loader