गेल्या पाच महिन्यांत ९ पर्यटकांचा बुडून मृत्यू

कल्पेश भोईर, वसई

मागील काही दिवसांपूर्वी अर्नाळा आणि भुईगाव समुद्रकिनाऱ्यावर चार पर्यटकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर वसईतील धोकादायक समुद्रकिनाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा  ऐरणीवर आला आहे. वसई विरार भागातील समुद्रकिनारे पर्यटनासाठी महत्त्वाचे समजले जातात, मात्र काही दिवसांपासून घडत असलेल्या मृत्यूच्या घटना यामुळे या ठिकाणचे किनारे धोकादायक बनू लागले असल्याचे समोर आले आहे.

वसई पश्चिमेतील परिसरात विस्तीर्ण असे समुद्रकिनारे आहेत. तसेच आजूबाजूचा परिसर हा निसर्गरम्य असल्याने वसई विरार शहर पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. अर्नाळा, नवापूर, भुईगाव, राजोडी, सुरुची, कळंब, रानगाव आदी समुद्रकिनारे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी मौजमजा करण्यासाठी या किनाऱ्यावर मोठय़ा संख्येने पर्यटक येत असतात. पंरतु गेल्या काही वर्षांपासून बुडून मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. मागील मार्च महिन्यात धुळवडीच्या दिवशी कळंब समुद्रकिनारी पाच पर्यटक बुडाले होते. तर नुकताच जुलै महिन्याच्या आठवडाभरात अर्नाळा आणि भुईगाव समुद्रकिनाऱ्यावर चार पर्यटक बुडाल्याच्या घटना घडल्या असल्याने सध्या समुद्रकिनारेच धोकादायक बनू लागल्याने पुन्हा एकदा पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

या सर्वच समुद्रकिनाऱ्यालगतच बेसुमार वाळू उपसा केला जात आहे. यामुळे समुद्रलगतच्या किनाऱ्यांची धूप होऊ  लागली आहे. त्यामुळे किनाऱ्यालगतच्या भागात खोली निर्माण होऊ  लागली आहे याचा अंदाज पर्यटकांना येत नसल्याने आत गेल्यानंतर पर्यटक आत ओढले जात असल्याने पर्यटकांच्या जिवाला धोका निर्माण होऊ लागला आहे. तसेच या समुद्रकिनाऱ्यावर सुट्टीच्या दिवशी मोठय़ा संख्येने पर्यटक पर्यटनासाठी येत असतात, मात्र या समुद्रकिनाऱ्यावर जीवररक्षक व पोलिसांचा अभाव, तसेच धोकादायक असलेल्या ठिकाणी लाल बावटे किंवा सूचना फलक नसणे हेही पर्यटकांच्या जिवावर बेतत आहेत.

समुद्रकिनारे पर्यटकांना आकर्षित करीत असल्याने त्यामध्ये पोहण्याचा मोह पर्यटकांना आवरत नाही. काही वेळा पर्यटक मद्यपान करून समुद्रात उतरतात तसेच स्थानिक प्रशासनाकडून समुद्रात पोहण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांसाठी सूचना फलक लावण्यात आले आहेत. पंरतु अतिउत्साही पर्यटक याकडे दुर्लक्ष करून पोहण्यासाठी समुद्रात उतरतात आणि आपला जीव गमावतात अशा अनेक घटना वसईत घडल्या आहेत. अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी वाळूउपसा यावर अंकुश ठेवला पाहिजे तसेच जीवरक्षक प्रत्येक समुद्रकिनाऱ्यावर तैनात करून ध्वनिवर्धकांच्या साहाय्याने येणाऱ्या पर्यटकांमध्ये जनजागृती केली पाहिजे. तसेच गैरवर्तन करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे असे नागरिकांनी सांगितले आहे.

समुद्रकिनाऱ्यावरील सुरक्षितता अबाधित राहण्यासाठी संबधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्यामुळे तेथील किनाऱ्याजवळ वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. पर्यटकांना सूचना देण्यासाठी सूचना फलक लावण्यात येणार असून यावर लक्ष ठेवण्यासाठी पथक तयार करण्यात येणार आहे.

डॉ. दीपक क्षीरसागर (प्रांतअधिकारी वसई )

समुद्रकिनाऱ्याच्या भागात पर्यटकांना वारंवार सूचना दिल्या जात आहे. पर्यटकांनीसुद्धा स्वत:ची काळजी घेतली पाहिजे. तसेच जे पर्यटक मद्यपान घेऊन किनाऱ्यावर जात आहेत अशांवर लक्ष ठेवण्यासाठी नाकाबंदी करून कारवाई सुरू करण्यात आली आहे.

विजयकांत सागर (अप्पर पोलीस अधीक्षक, वसई)

भुईगाव किनारी दोघे बुडाले

वसई : वसई पश्चिमेतील भुईगाव समुद्रकिनारी सहलीसाठी आलेले दोन तरुण बुडाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी वसईत घडली. रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध सुरू होता.भुईगाव समुद्रकिनारी शुक्रवारी सायंकाळी नालासोपारा येथील बाबानगर येथे राहणारे सहा ते सात तरुण सहलीसाठी आले होते. हे सर्व तरुण समुद्रात पोहण्यास गेले होते. लाटांमुळे सर्व तरुण बाहेर येण्यासाठी प्रयत्न करू लागले. मात्र दोघांना किनारी येण्यास अपयश आले. सोएल खान आणि अब्दुल खान असे या तरुणांची नावे आहेत.

हुल्लडबाजी जिवावर

समुद्रकिनाऱ्यावर येणाऱ्या काही पर्यटकांमार्फत मद्यपान करून हुल्लडबाजी केली जात असते. या हुल्लबाजीमुळे याचा फटका या ठिकाणी मौजमजा करणाऱ्या पर्यटकांना बसत असतो. नुकताच कळंब समुद्रकिनाऱ्यावर अतिउत्साही पर्यटकांमार्फत दारूच्या नशेत चारचाकी वाहन चालविल्याने अपघात झाला असल्याची घटना घडली आहे. अशा मद्यधुंद अवस्थेत वाहने चालविली जात असल्याने येथील पर्यटकांच्या  जिवावर बेतण्याची शक्यता असल्याचे बंदरपाडेकर संस्थेचे अध्यक्ष निनाद पाटील यांनी सांगितले आहे.

पाच महिन्यांत घडलेल्या घटना

२१ मार्च २०१९  – कळंब समुद्रकिनारी पाच पर्यटकांचा मृत्यू

२१ जुलै २०१९  – अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर दोन पर्यटकांचा मृत्यू

२६ जुलै २०१९  –     भुईगाव समुद्रकिनारी दोन पर्यटकांचा मृत्यू