कल्याण – कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील टिटवाळा परिसरातील उंभर्णी, मोहिली रस्त्यावरील ९० जोत्यांची बेकायदा बांधकामे अ प्रभागाच्या अधिकाऱ्यांनी जमीनदोस्त केली. या जोत्यांच्या माध्यमातून बेकायदा चाळींची उभारणी बांधकाम व्यावसायिकांकडून केली जाणार होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अ प्रभागाच्या अंतर्गत येणाऱ्या मोहिली, बल्याणी, उंभार्णी, मोहिली, मांडा, टिटवाळा भागात बेसुमारे बेकायदा चाळी बांधण्याची कामे भूमाफियांकडून सुरू आहेत. मोठ्या संख्येने प्रभागात कामे सुरू असताना अ प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त प्रीती गाडे, या प्रभागातील बेकायदा बांधकामांवर नजर ठेवणारे कनिष्ठ अभियंता, बीट मुकादम कोणतीही कार्यवाही, कारवाई या बांधकामांवर करीत नसल्याने नागरिक, तक्रारदारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती.

हेही वाचा – कल्याण : स्वच्छता अभियानातील निधीची उधळपट्टी आयुक्त इंदुराणी जाखड यांनी रोखली

बेकायदा बांधकामांविरुद्ध आक्रमक कारवाई करण्याचे आदेश आणि या कामात निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आयुक्तांच्या मार्गर्शनाखाली कठोर कारवाई करण्याचे अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी सूचित केले आहे. टिटवाळा परिसरातील बेकायदा बांधकामांंवर कारवाई होत नसल्याच्या तक्रारी वरिष्ठांपर्यंत गेल्यानंतर अ प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त प्रीती गाडे यांनी उंभार्णी मोहिली रस्त्यावरील बेकायदा चाळी उभारणीसाठी बांधलेले ९० जोते जेसीबीच्या साहाय्याने भुईसपाट केले.

अशीच कारवाई साहाय्यक आयुक्त गाडे यांनी बल्याणी टेकडी, वासुंद्री रस्ता, उंभार्णी भागातील बेकायदा चाळींवर करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पालिका अधिकारी बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यासाठी आक्रमक भूमिका घेत नाहीत. मात्र तक्रारदाराने यासंबंधी वरिष्ठांकडे तक्रारी केल्या की मात्र पोलीस बंदोबस्त मिळत नाही, पोलिसांनी बेकायदा इमारतीमधील कुटुंबीयांना घराबाहेर काढले नाही, अशी तकलादू कारणे देऊन बेकायदा इमारतींना अभय देत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.

हेही वाचा – कल्याणमध्ये शिधावाटप मध्यस्थाला लोखंडी सळईने मारहाण

डोंबिवली पश्चिमेत पालिकेच्या राखीव, खासगी जमिनींवर अनेक बेकायदा इमारती उभ्या राहिल्या आहेत. ठाकुरवाडीत प्रकाश गोठे, शंकर म्हात्रे यांनी गटारे तोडून बेकायदा इमारतींची उभारणी केली आहे. याच भागात प्रदीप ठाकूर, जी. एन. गंधे, राजे रजुनंदन राम यांनी खेळाच्या मैदानावर बेकायदा इमारत उभारली आहे. याविषयी पालिकेत तक्रारी करूनही या इमारती भुईसपाट करण्याची कारवाई ह प्रभागाकडून केली जात नसल्याने आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांंनी या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी तक्रारदार धिरेंद्र भोईर, संदीप पाटील यांनी केली आहे.

ठाकुरवाडीत प्रदीप ठाकूर यांच्या जमिनीवर उभारलेली बेकायदा इमारत ६५ महारेरा प्रकरणातील इमारत आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. या इमारतीवर ह प्रभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्त असूनही जुजबी कारवाई केली. हे प्रकरण आपण एसआयटी, उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणणार आहोत. – संदीप पाटील, वास्तुविशारद, याचिकाकर्ता.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 90 foundations destroyed in titwala foundations were set up for illegal chawl construction ssb