वसई-विरारमधील विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण कमी होण्याची आशा

कल्पेश भोईर, वसई

वसई-विरारमधील जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल करण्याचे काम सुरू असून एकूण शाळांपैकी ९० टक्के शाळांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत शाळांतील वर्गात अत्याधुनिक साहित्य आणण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण कमी होईल, असा विश्वास जिल्हा परिषदेने व्यक्त केला आहे.

वसई तालुक्यात जिल्हा परिषदेच्या १९७ शाळा आहेत. यातील ९० टक्के  शाळांचे ‘डिजिटायझेशन’काम पूर्ण झाले आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांनाही पुस्तकी ज्ञानाबरोबरच आधुनिक पद्धतीने देखील ‘प्रोजेक्टर’च्या साह्य़ाने विद्यार्थ्यांना शिकविले जात आहे. केंद्र सरकारने डिजिटल इंडिया या संकल्पनेच्या आधारे शाळाही डिजिटल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

त्यानुसार राज्यातील सरकारी कार्यालयांपासून ते शाळादेखील डिजिटल करण्यात  आल्या आहेत. यात स्क्रीन, प्रोजेक्टर, पाठय़पुस्तकीय अभ्यासक्रमाच्या ऑडियो आणि व्हिडीओ स्वरूपातील सीडी, ऑनलाइन लिंक, मॉनिटर अशा प्रकारचे ‘ई-साहित्य’ विद्यार्थी स्वत: हाताळू लागले आहेत. त्याची माहितीही त्यांना चांगल्या प्रकारे होऊ  लागली असल्याचे शालेय शिक्षकांनी सांगितले.

यामुळे शाळांमधून विद्यार्थ्यांना ऑनलाइन माहिती मिळू लागली आहे, तसेच याचा आनंदही शालेय विद्यार्थी घेऊ  लागले आहेत. एक शाळा डिजिटल करण्यासाठी साधारणपणे अडीच ते तीन लाख रुपये इतका खर्च येत असतो. त्यानुसार या कामाची सुरुवात करण्यात आली होती. ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागातील जिल्हा परिषद शाळा डिजिटल करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल करण्याबरोबरच आता विविध भागातील जिल्हा शाळेचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. त्यात विद्यार्थ्यांना रेखाचित्रे, अंक गणिते, गणितांची सूत्रे अशा विविध प्रकारच्या अभ्यासक्रमात समाविष्ट असलेल्या गोष्टीची चित्रेदेखील भिंतीवर काढण्यात येत असल्याचे शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

सौरऊर्जेचा वापर

वसई तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक जिल्हा परिषदेच्या शाळा या खेडोपाडी आहेत, मात्र या शाळांमध्ये विजेची व्यवस्था नसल्याने तेथील मुलांना डिजिटल शिक्षण घेण्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या, त्या अडचणी सोडविण्यासाठी शिक्षण विभागाने सौरऊर्जा उपकरणे बसविण्यात यावीत, अशी मागणी केली होती, त्यानुसार मागणी करण्यात आली होती. वसई पूर्वेतील भाताणे येथील इनामपाडा शाळेत सौरऊर्जा उपकरणे बसविण्यात आली आहेत. त्याच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या विजेवर तेथील विद्यार्थ्यांना देखील डिजिटल शिक्षण देण्यात येत आहे.

वसई तालुक्यातील १९७ शाळांमधून ९० टक्के शाळा डिजिटल करण्यात आल्या आहेत. तसेच डिजिटल बाकी असलेल्या शाळांचे कामदेखील सुरू आहे. लवकरच त्या देखील शाळा डिजिटल होतील.

माधवी तांडेल, शिक्षण अधिकारी, वसई विभाग

 

Story img Loader