बदलापूर : ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या महाराष्ट्र औद्याोगिक विकास महामंडळाच्या बारवी धरणात रविवारी सायंकाळपर्यंत ९२ टक्के पाणी जमा झाले होते. शनिवार आणि रविवारी सायंकाळपर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे अवघ्या काही तासांत दहा टक्के पाण्याची भर धरणात झाली. शनिवार आणि रविवारी धरण क्षेत्रात सुमारे २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील बहुतांश महापालिका, नगरपालिका आणि औद्याोगिक वसाहतींना बारवी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. २३ जुलै रोजी बारवी धरणात ५१ टक्के पाणीसाठा होता. गेल्या तीन-चार दिवसांच्या पावसामुळे बारवी धरण वेगाने भरले. पावसाचा जोर कायम राहिल्यास बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता असून आस्नोली, चांदप, चांदपपाडा, पिंपळोली, सागांव, पाटीलपाडा, पादीरपाडा,
कारंद, मोऱ्याचापाडा, चोण, रहाटोली, आघाणवाडी, फणसवाडी, वाकडीचीवाडी आदी नदी काठच्या परिसराला सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पाणी पातळीत रविवारी दुपारपर्यंत मोठी वाढ झाली. इशारा पातळी १६.५० मीटर असताना पाणी १६.३० मीटर उंचीवरून वाहत होते. परिणामी कल्याण-अहमदनगर महामार्गावर रायतेजवळची वाहतूक बंद करण्यात आली होती.