गेल्या वर्षभरात जमा-खर्चाचे गणित बिघडल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या ठाणे महापालिकेला विविध करांतून आर्थिक वर्षांअखेर चांगले उत्पन्न जमा झाले असून त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीत पुन्हा एकदा पैसे जमा झाले आहेत. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये महापालिकेने विविध करांतून सुमारे १४३७ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित धरले होते. त्यापैकी आर्थिक वर्षांअखेर १३६४ कोटी रुपयांचे उत्पन्न जमा झाले असून या आकडेवारीनुसार महापालिकेची ९४ टक्के करवसुली झाली आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पात आयुक्त संजीव जयस्वाल यांनी एकही मोठय़ा प्रकल्पाची घोषणा केली नाही. गेल्या वर्षी डिसेंबर अखेपर्यंत विविध करांतून सुमारे जेमतेम ४० ते ४५ टक्के वसुली झाल्यामुळे महापालिका आर्थिक संकटात सापडली होती. यातून महापालिकेला बाहेर काढण्यासाठी आयुक्त जयस्वाल यांनी गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून उत्पन्न वाढीवर अधिक भर दिला असून मार्चअखेर विविध करांतून महापालिकेला ९४ टक्के वसुली करण्यात यश आले आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये मालमत्ता करातून २८२.२८ कोटी, स्थानिक संस्था करातून ५८५.११ कोटी, शहर विकास विभाग २८० कोटी, पाणीपट्टीपोटी ११० कोटी, अग्निशमन दल ४९.६२ कोटी, सार्वजनिक बांधकाम विभागातून ६८.६३ कोटी, जाहिरात विभागातून ८.०६ कोटी, स्थावर मालमत्ता विभागातून ३.०८ कोटी आणि इतर विभागातून ५०.८३ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले होते. त्यापैकी मार्च अखेर मालमत्ता करातून २६४.९३ कोटी, स्थानिक संस्था करातून ५७०.५४ कोटी, शहर विकास विभाग २५७.२४ कोटी, पाणीपट्टीपोटी ७२.७६ कोटी, अग्निशमन दल ६०.८४ कोटी, सार्वजनिक बांधकाम विभागातून १००.५४ कोटी, जाहिरात विभागातून ६.४१ कोटी, स्थावर मालमत्ता विभागातून २.५६ कोटी आणि इतर विभागांतून २८.४८ कोटी रुपयांचे उत्पन्न जमा झाले आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा