ठाणे : उच्च माध्यमिक म्हणजेच बारावीच्या परीक्षा आजपासून सुरू होत असून ठाणे जिल्ह्यातून एकूण ९४ हजार ९४१ विद्यार्थी यंदा परीक्षेला बसले आहेत. करोना प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षा होऊ शकल्या नव्हत्या. या वर्षी विद्यार्थ्यांच्या लेखी स्वरूपात परीक्षा होणार असून ठाणे जिल्ह्यात एकूण ४१९ केंद्रांवर परीक्षा पार पडणार आहे, अशी माहिती ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
मागील काही दिवसांपासून करोनाचा प्रादुर्भाव ओसरला असून शाळा, महाविद्यालयेदेखील खुली करण्यात आली आहेत. त्यामुळे यंदाच्या वर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षाही लेखी स्वरूपात घेण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे. त्यानुसार, आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे. यंदा ठाणे जिल्ह्यातून ९४ हजार ९४१ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले आहेत. करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी मुख्य केंद्रासह उपकेंद्रही उभारण्यात आले असून विद्यार्थ्यांचे महाविद्यालये किंवा शाळा हेच उपकेंद्र आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात यंदाच्या वर्षी एकूण ४१९ केंद्रांवर परीक्षा पार पडणार आहे. या परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी जिल्ह्यात ५ भरारी पथके तैनात करण्यात आलेली असून, जिल्ह्यातील ६ अतिसंवेदनशील परीक्षा केंद्रांवर पथकांचे विशेष लक्ष असणार आहे.
माध्यमिक शिक्षणाधिकारी पथक, बैठे पथक, प्राथमिक शिक्षणाधिकारी पथक, विशेष महिला पथक आणि उपशिक्षणाधिकारी पथक ही पथके परीक्षा केंद्रांना भेटी देऊन गैरप्रकार रोखणार आहेत, अशी माहिती जिल्हा शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
ठाणे जिल्ह्यातून यंदाच्या वर्षी ९४ हजार ९४१ विद्यार्थी परीक्षेला बसले असून यामध्ये विज्ञान शाखेतील ३० हजार १७१, कला शाखेतील १५ हजार ३४३, वाणिज्य शाखेतील ४८ हजार ८११ आणि किमान कौशल्यावर आधारित प्रशिक्षणात ६१६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
परीक्षा केंद्रांवर विलगीकरण कक्ष
यंदाच्या वर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक परीक्षा केंद्रावर एक ते दोन विलगीकरण कक्ष उभारण्यात आले आहे. परीक्षेच्या दरम्यान एखाद्या विद्यार्थ्यांला ताप आल्यास त्या विद्यार्थ्यांवर या कक्षात उपचार देण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणी पेपर लिहिण्याची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे.