लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण : कल्याण पूर्वेतील एका अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार करून नंतर तिची हत्या करणारा चक्कीनाका येथील रहिवासी मारेकरी विशाल अभिमान गवळी आणि त्याला या प्रकरणात साथ देणाऱ्या पत्नी साक्षी गवळी यांच्यावर कोळसेवाडी पोलीस ठाण्याने पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ९४८ पानांचे दोषारोपपत्र शुक्रवारी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले.

विशाल गवळीने बालिकेची गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कल्याण पूर्वेतील चक्कीनाका येथील राहत्या घरात लैंगिक अत्याचार करून हत्या केली होती. नंतर तिच्या मृतदेहाची गांधारे-पडघा रस्त्यावरील बापगाव हद्दीत विल्हेवाट लावली होती. पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेने राज्यात खळबळ उडाली होती. बालिकेच्या हत्येप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह इतर अनेक कलमाने पोलिसांनी मृत मुलीच्या पालकांच्या तक्रारीवरून विशाल विरुध्द गु्न्हा दाखल केला होता.

मागील दोन महिने मारेकरी विशाल गवळी याला फाशी देण्याच्या मागणीवरून नागरिकांनी मोर्चे काढले होते. शासनस्तरावर या मागणीसाठी दाद मागितली होती. या प्रकरणातील आरोपी विशाल गवळीसह त्याच्या पत्नीला कठोरात कठोर शिक्षा होईल. या गुन्ह्यातील तपासात कोणत्याही त्रृटी राहू नयेत म्हणून अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव, पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, साहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे आणि पथकाने तपास केला.

बालिकेच्या हत्येनंतर विशाल गवळी शेगाव परिसरात आपल्या सासुरवाडीला पळून गेला होता. तेथे वेषांतर करून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना कल्याण, ठाणे गुन्हे शाखा, कोळसेवाडी, शेगाव पोलिसांच्या पथकाने त्याला अटक केली होती. याप्रकरणात तातडीने आरोपपत्र न्यायालयात दाखल केले जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले होते. परंतु, या गुन्ह्यातील तपासात कोणत्याही त्रृटी राहू नयेत, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होईल या बाजुने पोलिसांनी तपास केला.

सुक्ष्म पध्दतीने भक्कम पुरावे जमा करून उपायुक्त झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण न्यायालयात हे आरोपपत्र शुक्रवारी दाखल करण्यात आले. हा खटला जलदगती न्यायालयात चालविला जाईल. याप्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा होईल या दृष्टीने प्रयत्न केले जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मृत बालिकेच्या कुटुंबीयांना दिले आहे. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे ॲड. उज्वल निकम बाजू मांडणार आहेत. पोलिसांनी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या विशालच्या तीन भावांना ठाणे जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. त्यांची सातारा परिसरात रवानगी करण्यात आली आहे.

Story img Loader