नाटय़ संमेलने नेमकी त्या त्या शहरांना देतात काय, हा प्रश्न एखादं नाटय़ संमेलन एखाद्या शहरात झाल्यानंतर सगळ्यांनाच पडतो. यंदाचं नाटय़ संमेलन मुंबईच्या वेशीवर असलेल्या ठाण्यात आहे. त्या अनुषंगाने हे नाटय़ संमेलन ठाण्याला काय देणार, याचं उत्तर शोधायला हवं.

संगीत नाटकांपासून ते आधुनिक नाटय़ापर्यंत आणि प्रायोगिक नाटकांपासून व्यावसायिक नाटकांपर्यंत महाराष्ट्राला लाभलेली नाटय़पंरपरा खूप मोठी आहे. भारतातल्या जवळपास सर्वच राज्यांमध्ये नाटक होतं. पण गेल्या ९५ हून अधिक वर्षे नाटय़ संमेलन भरवणारी एकमेव रंगभूमी महाराष्ट्रातच आहे. याच महाराष्ट्रात प्रायोगिक नाटय़ चळवळीची बीजं रोवली गेली. किंबहुना त्याचा वटवृक्षही इथेच झाला. आजही रंगभूमीवर विविध प्रयोग करणाऱ्या काही भाषांतील रंगभूमीमध्ये मराठी रंगभूमीचं स्थान आद्य आहे. विशेष म्हणजे इथे अर्थगर्भ आणि विशेष प्रयोगशील नाटकंही व्यावसायिकदृष्टय़ा प्रेक्षकांच्या पसंतीला उतरतात. त्यामुळे मराठी रंगभूमी समृद्ध होण्यात येथील प्रेक्षकांचा अर्थातच मराठी माणसांचा वाटाही मोठा आहे.

याच प्रायोगिक नाटय़ चळवळीचं एक बी १९७०च्या दशकात ठाण्यात रुजलं होतं. विजया मेहता यांच्या रंगायनमध्ये काम करणारे आणि ठाण्यात राहणारे अशोक साठे यांनी ठाण्यातही या नाटय़ चळवळीची मुहूर्तमेढ रोवली. श्रीहरी जोशी, अशोक साठे, रजन ताम्हाणे, मधु ताम्हाणे, भालचंद्र रणदिवे आदींनी मित्र सहयोग नावाची संस्था सुरू करून सातत्याने विविध प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. त्याशिवायही ठाण्यात श्याम फडके, रवी पटवर्धन, डॉ. रमेश शेजवलकर, अशोक समेळ यांच्यासारखे नाटककार, दिग्दर्शक आणि नट आदीही या चळवळीशी संबंधित होते आणि आहेतही. पुढे प्रा. मंदार टिल्लू, राजेश राणे, राजू तुलालवार यांनी बालनाटय़ चळवळीची सुरुवात ठाण्यात सुरू केली. याच्या पुढे जाऊन आता डोंबिवलीत संकेत ओक, मधुरा आपटे हे तरुण ‘वेध’सारखे उपक्रम राबवून रंगभूमीवर नवनवीन प्रयोग करत आहेत.

हे सर्व सांगण्याचा मुद्दा एवढाच की, ठाण्यातील माती रंगभूमीला प्रचंड पोषक आहे. जिल्ह्य़ातील गडकरी रंगायतन, डॉ. काशिनाथ घाणेकर थिएटर, आचार्य अत्रे कलामंदिर, सावित्रीबाई फुले नाटय़मंदिर ही चार प्रमुख नाटय़गृहं! गडकरी रंगायतनसह भावनिक नातं असलेले अनेक कलाकार आजही ठाणेकर रसिकांबद्दल भरभरून बोलतात. त्यामुळे ठाण्यासारख्या कलासक्त शहरात नाटय़ संमेलन व्हावं, ही ठाण्यासाठी आणि ठाणेकरांसाठीही नक्कीच अभिमानास्पद गोष्ट आहे.

पण या नाटय़ संमेलनामुळे नेमकं ठाणेकरांना मिळणार काय, हा प्रश्न विचारला, तर प्रसिद्धीशिवाय काहीच नाही, असं उत्तर द्यावं लागेल. सध्या नाटय़ संमेलनाच्या आयोजनात चाललेले घोळ सर्वच जण वर्तमानपत्रांतून वाचत आहेतच. कार्यक्रम ठरवण्यापासून कार्यक्रम पत्रिका छापण्यापर्यंत सगळीकडेच छान धम्माल सुरू आहे. संमेलनाच्या नियोजनाची सर्व मदार ‘ठाणेकरां’च्या एकखांबी तंबूवर असली, तरी त्या एका खांबाला लागलेला राजकीय टेकू, हादेखील खूप महत्त्वाचा घटक आहे. मात्र त्यातही शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांचे आमदार-खासदार या संमेलनाच्या आयोजनात असल्याने युतीच्या कलगीतुऱ्याचा रंग संमेलनाला चढला नसता तरच नवल!

मुळात संमेलनावर कोटय़वधी रुपये खर्च करून नेमकं काय साध्य होणार, हा प्रश्न नाटय़ संमेलनच नाही, तर साहित्य संमेलनाबाबतही विचारला जातो. वास्तविक आज मराठी साहित्याला किंवा रंगभूमीलाही अशा दिखाऊ आणि बडेजाव मिरवणाऱ्या संमेलनांपेक्षाही खूप खोलात जाऊन काम करण्याची गरज आहे.

एकेकाळी प्रायोगिक नाटय़ चळवळीत आपला वाटा उचलणाऱ्या ठाण्यातील प्रायोगिक नाटय़संस्थांची आणि नाटकांची सध्याची स्थिती, ‘आई जेवू घाली ना आणि बाप भीक मागू देई ना’ अशी आहे. हा मुद्दा थोडा विस्तारित करून सांगायचा तर, आज ठाण्यात (इथे ठाणे जिल्हा अपेक्षित आहे) बालनाटय़ किंवा अभिनय प्रशिक्षण शिबिरं अनेक आहेत. त्या शिबिरांची व्यावसायिक गणितं आणि मीटर जोरात धावतात. पण त्या पलीकडे जाऊन प्रायोगिक रंगभूमीवर काम करणाऱ्या सुनील हरिश्चंद्र, दिगंबर आचार्य, डॉ. प्रसाद भिडे, संकेत ओक यांना आजही खूप मोठय़ा आव्हानांचा सामना करावा लागत आहे. यातील सर्वात मोठं आव्हान म्हणजे तालमींसाठी जागा शोधण्याचं! एखादं प्रायोगिक नाटक रंगभूमीवर आणण्यासाठी किमान २० ते २५ दिवस सलग तालमी घेणं आवश्यक आहे. या तालमींसाठी ठाणे जिल्ह्य़ात एकही किफायतशीर हॉल नाही. शाळांचे हॉल फक्त रात्रीच्या वेळी उपलब्ध असतात. त्यातही गेल्या काही वर्षांत फुटलेल्या नृत्य प्रशिक्षण संस्थांच्या पेंवामुळे हे तालीम हॉलही नाटकांना उपलब्ध होताना मारामार असते. गडकरी रंगायतनचा तालीम हॉल दोन-तीन महिन्यांपासून आरक्षित असतो. या तालीम हॉलसाठीचं भाडंही प्रचंड म्हणजे तासाला २५० रुपयांपासून कितीही असतं. दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्रासारखा ताशी १०० रुपये आकारणारा एकही तालीम हॉल आज ठाणे जिल्ह्य़ात नाही. त्यामुळे २० ते २५ दिवस फक्त चार तास तालमी करण्यासाठी जागेचाच खर्च २५ हजारांच्या आसपास जातो. प्रायोगिक रंगकर्मींसाठी ही खूपच मोठी रक्कम आहे. त्यापुढे जाऊन नाटक उभं करण्यासाठीचे वेगळे पैसे टाकावेच लागतात. ठाण्यात तालमींसाठी स्वत:चा हॉल किंवा जागा असलेल्या संस्था खूपच कमी आहेत. परिणामी नाटक उभं करताना तालमींच्या खर्चामुळेच प्रायोगिक रंगकर्मी अर्धमेले होतात.

दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे अशी नाटके सादर करण्यासाठीच्या मिनी थिएटर्सचा. डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़मंदिरातील मिनी थिएटर वगळता ठाण्यात नाटकांसाठी एकही सुसज्ज मिनी थिएटर नाही. आता ठाण्यात कोर्ट नाक्याजवळ टाऊन हॉल येथे अँफी थिएटर उभं राहिलं आहे. पण तिथेही अजून नाटकांचे प्रयोग होताना दिसत नाहीत. पण कल्याण, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ, आसनगाव अशा नव्याने उभ्या राहणाऱ्या शहरांमध्ये नाटय़गृहच काय, पण मिनी थिएटरची सोयही नाही. अर्थात ही कामं संबंधित शहरांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी करायची असतात. पण नाटय़ संमेलनाच्या पाश्र्वभूमीवर ही कामं होणार की नाही, हा एक मोठा प्रश्न आहेच.

तुलना कदाचित चुकतही असेल, पण गुजराथी रंगभूमीशी तुलना केली, तर मराठी व्यावसायिक रंगभूमी खूपच बाल्यावस्थेत आहे. मराठीत एखादं नाटक बाळसं धरण्यासाठी त्या नाटकाचे किमान २५ प्रयोग व्हावे लागतात. त्यानंतर मग लोकप्रियतेतून त्या नाटकाला प्रतिसाद मिळायला सुरुवात होते. अनेकदा २५ प्रयोगांपर्यंत निर्मात्याच्या तोंडाला फेस येतो. गुजराथी रंगभूमीवर नाटकाच्या तालमी सुरू होण्याआधीच अनेकदा अनेक संस्था त्या नाटकाचे प्रयोग विकत घेऊन मोकळ्या झालेल्या असतात. मराठी रसिकांनीही ही गोष्ट ध्यानात घ्यायला हरकत नाही. विविध शहरांमध्ये असे नाटय़वेडय़ा प्रेक्षकांचे गट तयार झाले, तर त्या गटांसाठी एक एक प्रयोग होऊन नाटकांना धुगधुगी मिळेल. यंदाच्या नाटय़ संमेलनाकडून ठाणेकरांना या अपेक्षा नक्कीच असतील.

Story img Loader