शहापूर: शहापूर येथील अघई भागात एका १५ वर्षीय मुलीवर पाच जणांनी लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मागील महिन्याभरापासून तिच्यावर अत्याचार सुरू होते. पिडीत मुलीच्या लहान भावाने हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती शहापूर पोलिसांनी दिली.
अघई भागात पिडीत मुलगी वास्तव्यास आहे. याच भागात राहणाऱ्या पाच मुलांनी तिला निर्जन स्थळी नेऊन लैंगिक अत्याचार केले. सुमारे महिन्याभरापासून हा प्रकार सुरू होता. पिडीत मुलीचे आई-वडील हे मजुरीचे काम करतात. ते सकाळी घरातून मजुरीचे काम करण्यासाठी निघून जायचे. त्यावेळी पिडीत मुलगी आणि तिचा लहान भाऊ असे दोघेच घरात असायचे. पिडीत मुलीचे आई-वडिल मजुरीच्या कामावर निघून गेल्यानंतर आरोपी घरी यायचे आणि ते तिला उचलून निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत होते. हा प्रकार तिच्या लहान भावादेखत सुरू होता.
हेही वाचा… राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे डोंबिवलीत विधी महाविद्यालय
महिनाभरानंतर त्याने आईला हा प्रकार सांगितला. त्यानंतर पिडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीच्या आधारे शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात आरोपींचा शोध सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच भिवंडी येथील खारबाव भागात एका अल्पवयीन मुलीवर सात जणांनी सामुहिक लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्याने मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.