भगवान मंडलिक

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डोंबिवली: डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखाणपाडा येथील हरितपट्टा भूमाफियांनी १० बेकायदा इमारती बांधून हडप केल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर, आता डोंबिवली पूर्व भागातील आयरे गाव, कोपर पूर्व रेल्वे स्थानक भागातील एक लाख ७५ हजार चौरस फुटाचा म्हणजे ४४ एकरचा हरितपट्टा (ग्रीन झोन), सागरी किनारा नियमन क्षेत्राचा (सी. आर. झेड) भूभाग भूमाफियांनी १४ बेकायदा इमारती, दोन हजाराहून अधिक बेकायदा चाळी बांधून हडप केला आहे.

हेही वाचा >>> डोंबिवलीतील आयरे गाव, कोपर पूर्व हरितपट्ट्यातील बांधकामांना बेकायदा नळजोडण्या

या बेकायदा बांधकामांमुळे या भागातील जैवविविधता नष्ट झाली असून, जलचर, विविध प्रकारचे अधिवास या भागातील जुनाट झाडे, खारफुटीची झाडे तोडण्यात आल्याने नष्ट झाला आहे. या भागातील खाडीला मिळणारे नैसर्गिक नाल्यांचे प्रवाह बांधकामांसाठी बुजविण्यात आले आहेत. कोपर पूर्व रेल्वे स्थानक ते शिळफाटा रस्त्याकडे जाणारा ३० मीटर रुंदीचा विकास आराखड्यातील रस्ताही माफियांनी बेकायदा चाळी, इमारती बांधून हडप केला आहे.

हेही वाचा >>> “…अन्यथा शिंदे गट आणि पोलीस जबाबदार असतील”, ठाण्यात शाखांवरून ठाकरे-शिंदे गटामध्ये वाद उफाळला

कल्याण डोंबिवली पालिकेचा टिटवाळा-दुर्गाडी-मोठागाव-कोपर-आयरे-भोपर-काटई-शिळरस्ता ते हेदुटणे गावाकडे जाणारा २१ किमीचा लांबीचा बाह्यवळण रस्त्याचा एक किलोमीटर लांबीचा टप्पा भूमाफियांनी चाळी, इमारती बांधून हडप केला आहे. सात माळ्यापासून ते १० माळ्यापर्यंतच्या टोलेजंग बेकायदा इमारती हरितपट्टा, सी. आर. झेड. क्षेत्रात माफियांनी बांधून पूर्ण केल्या आहेत. ५० हून अधिक बेकायदा चाळींची राजरोस कामे हरितपट्ट्यात सुरू आहेत. दोन वर्षापूर्वी तत्कालीन ग प्रभाग साहाय्यक आयुक्त स्नेहा करपे, अरुण नलावडे यांनी ही बांधकामे तोडण्याची जोरदार मोहीम राबविली होती. या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर या भागात पुन्हा बेकायदा बांधकामे फोफावली, असे या भागातील रहिवाशांनी सांगितले.

आयरे गाव मधील रहिवासी अंकुश केणे, तानाजी केणे गेल्या दोन वर्षापासून या भागातील बेकायदा बांधकामांच्या तक्रारी पालिका आयुक्त, अतिक्रमण नियंत्रण उपायुक्त, ग प्रभाग साहाय्यक आयुक्त यांना करत आहेत. त्यांच्या तक्रारीची दखल प्रशासन घेत नसल्याने तक्रारदार केणे यांनी याप्रकरणी मुख्य सचिव, नगरविकास विभागाकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाकडूनही कारवाई झाली नाहीतर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे.

हेही वाचा >>> फलाट आणि लोकलमधील अंतराचा शहाड रेल्वे स्थानकात प्रवाशांना फटका

३४० सदनिका विक्रीसाठी सज्ज

हरितपट्ट्यातील टावरेपाडा येथे सहा ते नऊ माळ्याच्या सात बेकायदा इमारती, कोपर पूर्व रेल्वे स्थानकाजवळ चार बेकायदा इमारती, हनुमान मंदिराजवळ एक इमारत, सरस्वती शाळेजवळ चार माळ्याची बेकायदा इमारत. अशा एकूण १४ बेकायदा इमारती हरितपट्टा भागात उभारण्यात आल्या आहेत. या इमारतींमधील ३४० सदनिका, व्यापारी गाळे माफियांनी विक्रीसाठी सज्ज ठेवले आहेत. दोन ते तीन हजार चाळी या भागात उभारण्यात आल्या आहेत. ५० हून अधिक बेकायदा चाळींची बांधकामे आयरे गाव, कोपर पूर्व, भोपर रेल्वे मार्गिका भागात जोमाने सुरू आहेत. डोंबिवलीत बेकायदा बांधकाम करणारे माफिया या भागात सक्रिय असल्याचे आयरे भागातील जाणकारांनी सांगितले.

डोंबिवली शहरा लगतचे हरितपट्टे भूमाफियांनी आक्रमकपणे हडप करण्यास सुरुवात केली असताना पालिका प्रशासन याविषयी मूग गिळून असल्याने पर्यावरणप्रेमी नागरिक पालिकेविषयी तीव्र संताप व्यक्त करत आहेत.

नगररचना विभाग

कोपर पूर्व रेल्वे स्थानक, आयरे भागातील एक लाख ७५ हजार चौरस फुटाचा भाग हा हरितपट्टा, सी. आर. झेड. क्षेत्रात येतो. त्यामुळे या भागात पालिकेने इमारत बांधकामाला परवानगी दिलेली नाही, अशी माहिती नगररचना विभागातील एका अधिकाऱ्याने दिली. सी. आर. झेड. विभागही याविषयी मौन बाळगून असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

“आयरेगाव भागात सुरू असलेल्या सर्व बेकायदा बांधकामांचे सर्व्हेक्षण करुन त्यांना नोटिसा पाठविण्याची कार्यवाही लवकरच सुरू करणार आहोत. जी बांधकामे अनधिकृत आढळतील ती जमीनदोस्त केली जातील.”

-संजय साबळे साहाय्यक आयुक्त ग प्रभाग, डोंबिवली

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A 44 acre green area in ayre village kopar east in dombivli illegal constructions ysh