ठाणे राज्यात भाजप आणि शिंदे गटाची सत्ता असताना राज्यातील सत्ताबदलाचे केंद्रबिंदू ठरलेल्या ठाण्यात मात्र, भाजप आणि शिंदे गटातील मतभेद टोकाचे होत असलेले दिसत आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा शहरात रुग्णालय उपलब्ध व्हावे यासाठी भाजपने प्रभाग समितीवर मोर्चा काढून धरणे आंदोलन केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचे निकटवर्तीय मानले जाणारे माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांच्यावर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी टिका केली केली. दिव्यात भस्मासूरासारख्या इमारती उभ्या करायच्या आहेत. त्यातून पैसा आणि सत्ता निर्माण करणे इतकेच मढवी यांचे ध्येय असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे राज्यात सत्ता असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात भाजप आणि शिंदे गटामधील धूसफूस चव्हाट्यावर येताना दिसत आहे.
हेही वाचा >>>ठाण्यात वर्षभरात ८५७१ थकबाकीदारांच्या नळजोडण्या खंडीत; यंदा पाणी देयंकाच्या वसुलीत १४ कोटी रुपयांनी वाढ
दिवा शहरात मागील काही वर्षांपासून मोठ्याप्रमाणात नागरिकीकरण वाढले आहे. या भागात शिवसेनेचे एकूण आठ नगरसेवक निवडूण जातात. सध्या नगरसेवकांचा काळ संपुष्टात आल्याने महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू आहे. परंतु शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर येथील माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री शिंंदे यांना आपले समर्थन दिले आहे. राज्यात सध्या एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपची सत्ता आहे. राज्यात या दोन्ही पक्षांची सत्ता असली तरी स्थानिक पातळीवर या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये अंतर्गत वाद कायम असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा >>>मालमत्ता करात सूट न दिल्यास पलावातील रहिवाशांचा आंदोलनाचा इशारा
काही महिन्यांपूर्वी दिवा येथे शिंदे गटाच्या माजी नगरसेविकांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी दिव्याचे सिंगापूर करू अशी घोषणा केली होती. त्यानंतर भाजपने नरेश म्हस्के यांच्यावर दिव्यातील असुविधांचे चित्रीकरण समाजमाध्यमावर पाठवून टिका करण्यास सुरूवात केली होती. तसेच समूह विकास योजनेच्या (क्लस्टर) मुद्द्यावरून खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावरही टिका केली होती. सोमवारी पुन्हा भाजपचे दिवा शहराध्यक्ष रोहिदास मुंडे, महिला मोर्च्या अध्यक्ष ज्योती पाटील, ठाणे शहर कार्यकारणी सदस्य विजय भोईर यांच्यासह भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या दिवा प्रभाग समितीवर मोर्चा काढला होता. यावेळी भाजपने येथील माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांच्यावर टिका केली. मोर्चा निघाल्याने रमाकांत मढवी यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. दिव्यात मढवी यांचे विकासासाठी कसलेच योगदान नाही. दिव्यात भस्मासूरासारख्या इमारती उभ्या करायच्या आहेत. त्यातून पैसा आणि सत्ता निर्माण करणे इतकेच मढवी यांचे ध्येय असल्याचा गंभीर आरोप रोहीदास मुंडे यांनी केला आहे.
ठाण्यात शिंदे गट आणि भाजपतील कार्यकर्त्यांमध्ये धूसफूस अनेकदा चव्हाट्यावर आली आहे. काही महिन्यांपूर्वी ठाण्यात भाजपच्या पदाधिकाऱ्याला मारहाण प्रकरणी शिंदे गटाच्या माजी नगरसेवकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. तसेच दिव्यात एका संघटनेच्या पदाधिकाऱ्याला शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याने मारहाण केली होती. या मारहाणीनंतर भाजपचे नेते कृपाशंकर सिंग यांनी त्या पदाधिकाऱ्यावर कारवाई करण्यासाठी मुंब्रा पोलिसांना सूचना केली होती.