डोंबिवली – मतदार राजा, हे मतदान तुझ शेवटचे मतदान ठरू नये, तुझ एक मत हुकूमशाही उलथविण्यासाठी, असे आवाहन करत उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या डोंबिवली शहर शाखेने केंद्रातील भाजप सरकारला आव्हान देणारे फलक येथील फडके रस्ता भागात लावल्याने खळबळ उडाली आहे.
राष्ट्रीय स्वयंंसेवक संघाचे वर्चस्व असलेला डोंबिवली विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला ओळखला जातो. अनेक वर्ष या मतदारसंघावर भाजपचे निर्विवाद वर्चस्व आहे. भाजपचे आमदार तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण या मतदारसंघाचे नेतृत्व करीत आहेत. ही परिस्थिती असताना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या डोंबिवली शहर शाखेकडून केंद्रातील भाजप सरकार उलथून टाकण्याचे आवाहन फलकबाजीच्या माध्यमातून डोंबिवलीतील सर्वाधिक वर्दळीच्या फडके रस्ता, बाजीप्रूभ चौक, इंदिरा चौकात आल्याने खळबळ उडाली आहे.
सत्तेला आव्हान देणारे फलक शहरात लागले की संबंधित पक्षाची नेते मंडळी तातडीने हे फलक काढून टाकण्याचे आदेश पालिकेच्या वरिष्ठांना देतात. परंतु, डोंबिवलीत अशाप्रकारे फलक लागूनही ते काढून टाकावेत म्हणून भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पुढाकार न घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
हेही वाचा >>>डोंबिवलीतील तरूणाची इन्स्टाग्रामच्या माध्यमातून १७ लाखाची फसवणूक
राष्ट्रवादीचे दिवंगत नेते वसंत डावखरे यांच्या सारखेच मंत्री रवींद्र चव्हाण यांचे सर्व पक्षीय प्रमुख, नेते यांच्याशी स्नेहाचे संबंध आहेत. या नाते संबंधांमुळे भाजपचे डोंबिवलीतील पदाधिकरी, कार्यकर्ते उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून लावलेल्या फलकांवरून मौनाची भूमिका घेऊन बसले आहेत का, असाही शहरातील चर्चेचा सूर आहे.
सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांकडून डोंंबिवलीत संविधान बचाव फेरी काढण्यात आली होती. त्यावेळी देशात आता जो कारभार सुरू आहे त्याविषयी सर्वच पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करून संविधान आणि देश बचावाचे आवाहन नागरिकांना करण्यात आले. त्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया म्हणजे संबंधित फलक आहे.-सदानंद थरवळ, जिल्हाप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे, डोंबिवली.
असे काही फलक लावले असतील तर शहराचे विद्रुपीकरण केले म्हणून यासंबंधी पालिका आयुक्तांकडे तक्रार केली जाईल. ते फलक काढण्याची आणि संबंधितांविरूध्द कारवाई करण्याची मागणी केली जाईल.- समीर चिटणीस, अध्यक्ष,डोंबिवली पश्चिम मंडल.