ठाणे जिल्ह्यात खड्डे बळींचे सत्र सुरूच आहे. रविवारी रात्री दिवा येथील आगासन गावात खड्डा चुकविताना टँकर खाली चिरडून दुचाकीस्वार गणेश पाले (२२) याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात टँकर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातानंतर दिवा गावात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून येथील नागरिकांकडून प्रशासनाच्या कारभारावर टिका केली जात आहे. दरम्यान, ठाणे जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यात आतापर्यंत सहाजणांचे खड्ड्यांमुळे मृत्यू झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> खड्ड्याने घेतला आणखी जीव, डोंबिवली जवळील आगासन गावात खड्डा चुकविताना तरुणाचा मृत्यू, मनसे आमदार प्रमोद पाटील यांची सरकारवर टीका

आगासन येथील ओमकारनगर परिसरात गणेश हा राहत होता. येथील आगासन- दिवा रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झालेली आहे. रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास गणेश हा याच आगासन- दिवा मार्गावरून दुचाकीने दिवा येथे जात होता. रस्त्यावरील खड्डा चुकविताना गणेशचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि तो दुचाकीवरून खाली पडला. त्याचवेळी समोरून येणाऱ्या पाण्याच्या टँकरच्या चाकाखाली गणेश आल्याने तो चिरडला गेला. या घटनेनंतर स्थानिक रहिवाशांनी त्याला कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वी डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अपघाताचे सीसीटीव्ही चित्रीकरण समाजमाध्यमावर प्रसारित झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेनंतर संपूर्ण शहरात शोककळा पसरली असून गावकऱ्यांकडून ठाणे महापालिका प्रशासनावर टिका केली जात आहे.

आगासन-दिवा हा रस्ता अरुंद आहे. त्यात या मार्गावर पथदिवे नसल्याचा आरोप वाहन चालकांकडून केला जात आहे. खड्डा चुकविताना अपघाती मृत्यू झाला असतानाही या घटनेप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात भरधाव टँकर चालविल्यामुळे अपघात झाल्याची नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळावरून टँकर चालक फरार झाल्याने पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, ठाणे जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे आतापर्यंत सहाजणांचे बळी गेले आहेत. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा >>> मुख्यमंत्री ठाण्याचे तरी ‘दिवा’ अंधारातच , मनसे आमदार प्रमोद पाटील यांच्यासह नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया

ठाण्यासाठी मोठ्या निधीच्या घोषणा होत आहेत. विकास कामांची चंगळ या भागात होणार आहे. मग ठाण्यात दिवा असूनही आणि मुख्यमंत्री ठाण्याचे असूनही दिवा-आगासन गाव परिसरावर विकास कामांच्या बाबतीत अन्याय का ? कागदोपत्री, फलकबाजीतून कामे दाखविण्यापेक्षा, प्रत्यक्ष कृतीत कामे दाखवा. तरच असे खड्डे अपघात थांबतील. – प्रमोद पाटील, मनसे आमदार, कल्याण ग्रामीण.

आगासन-दिवा भागात १६०० मीटर काँक्रीटचा रस्ता तयार करण्याचे काम सुरू असून जागेच्या वादामुळे ४०० मीटर रस्त्याचे काम रखडले आहे. याच भागात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. असे अपघात होऊ नये म्हणून शहरातील रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम निरंतर सुरू राहील. – प्रशांत सोनाग्रा, नगरअभियंता, ठाणे महापालिका.

२ जुलै : कल्याण येथील म्हारळ-वरप येथे नारायण भोईर (६५) यांचा खड्डा चुकविताना मृत्यू
५ जुलै : घोडबंदर येथील काजूपाडा भागात खड्डा चुकविताना एसटीखाली चिरडून मोहसीन खान यांचा मृत्यू
१६ जुलै : कल्याण -बदलापूर मार्गावर अंकित थविया (२६) याचा खड्डयामुळे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने मृत्यू
२३ जुलै : मुंबई- नाशिक महामार्गावरील रांजनोली नाका येथे ब्रिजेशकुमार जैस्वार यांची दुचाकी खड्डय़ात गेल्याने डम्परखाली चिरडून त्यांचा मृत्यू
७ ऑगस्ट : नदीनाका पुलावर खड्डय़ामुळे दुचाकीचा वेग कमी केल्याने मागून ट्रकने दिलेल्या धडकेत अशोक काबाडी (६५) यांचा मृत्यू
२८ ऑगस्ट : आगासन -दिवा मार्गावर खड्डे चुकविताना तोल जाऊन टँकरच्या चाकाखाली आल्याने गणेश पाले (२२) याचा मृत्यू.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A biker died after falling under a tanker while dodging a pothole amy