कल्याण – मागील २५ वर्षे कल्याण डोंबिवली पालिकेत साखळी पद्धतीने (सिंडीकेट) नालेसफाईची कामे करून गुणवत्ताधारक ठेकेदारांना पालिकेत येण्यास मज्जाव करणाऱ्या ठेकेदारांची मक्तेदारी मोडून काढण्याचा धाडसी निर्णय यावेळी प्रशासनाने घेतला. नालेसफाईच्या तीन कोटी ६९ लाख ६४ हजार रुपयांच्या निविदा भरणाऱ्या प्रस्थापित ठेकेदारांनी यावेळी प्रशासनाची कोंडी करण्याचा निर्णय घेतला. असा कोंडीचा कट रचणाऱ्या चार ठेकेदारांना एक वर्षासाठी काळ्या यादीत टाकण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आयुक्त, शहर अभियंता विभागाने घेतल्याने पालिकेत समाधानाचे वातावरण आहे.
वर्षानुवर्ष ठराविक ठेकेदार पालिकेत राजकीय दबाव, दहशतीचा अवलंब करून आपल्यालाच काम मिळेल अशा साखळी पद्धतीने निविदा भरण्याची कामे करत आहेत. पालिकेच्या प्रत्येक कामांमध्ये अशी मक्तेदारी निर्माण केलेले ठेकेदार आहेत. ते सचोटीने, प्रामाणिकपणे काम करणाऱ्या ठेकेदारांना निविदा स्पर्धेत उतरणार नाहीत अशा पद्धतीने वर्षानुवर्ष व्यूहरचना आखत आले आहेत. त्यांचे हे डाव यावेळी आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे, शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनी उधळून लावले.
हेही वाचा – ठाण्यात रस्त्यावर बारीक खडीचे थर; अपघात होण्याची भिती
बंदी घातलेले ठेकेदार
मे. रिशी कन्सट्रक्शन (गिता काॅम्पलेक्स, हाॅस्पिटल रोड, उल्हासनगर), मे. सुमित राजेंद्र मुकादम (रा. मल्हार आशीष बंगला, कचोरे गाव, गावदेवी मंदिरा समोर, खंबाळपाडा), मे. भावेश रमेश भोईर (रा. सरवलीपाडा, सरवली, भिवंडी), मे. गणेश ॲन्ड कंपनी, (दुल्हान महल चेंबर, उल्हासनगर).
ठेकेदारांची अडवणूक
पालिकेने अ, ब, क, जे, ह, फ, ग, आय, ई, ड या दहा प्रभागांमधील आणि राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्देशानुसार ११ नाले सफाईच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू केली होती. २९ ते ३० टक्के कमी दराने सहभागी ठेकेदारांनी निविदा भरल्या होत्या. १९ लाख ते ४२ लाख रुपयांपर्यंतच्या या निविदा होत्या. ११ निविदांपैकी चार निविदा मे. रिशी कन्स्ट्रक्शन, तीन निविदा मे. सुमित, दोन निविदा मे. भावेश, मे. गणेश यांनी भरणा केल्या होत्या. शासन नियमाप्रमाणे शहर अभियंता विभागाने ठेकेदारांना आठ लाखांपासून ते १८ लाखांपर्यंतच्या सुरक्षा अनामत रकमा २४ एप्रिलपर्यंत भरण्याचे आदेश दिले. विहित कालावधीत ठेकेदारांनी रकमा भरल्या नाहीत. या कमी-अधिक दराने निविदा भरणा केलेल्या ठेकेदारांना पालिकेने तुम्ही कमी दराने काम करण्यास तयार आहेत का, अशी विचारणा करण्यासाठी चर्चेस बोलविले. त्या बैठकीकडे ठेकेदारांनी पाठ फिरवली. कमी दराची निविदा भरणा करूनही पालिकेच्या कोणत्याही प्रक्रियेला चारही ठेकेदारांनी प्रतिसाद दिला नाही.
पालिकेची संगनतमाने कोंडी करण्याचा हा प्रयत्न असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. या ठेकेदारांमुळे पालिकेला पावसाळ्यापूर्वीची नालेसफाईची कामे विहित वेळेत सुरू करता आली नाहीत, अशी प्रशासनाची खात्री झाली. प्रत्येक विकास कामांच्या निविदांच्यावेळी ठेकेदार अशा अडवणुकीच्या मनोवृत्तीने वागू लागले तर प्रशासनाला कामे करणे मुश्किलीचे होईल. नालेसफाईच्या कामात अडवणुकीच्या भूमिका घेणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.
“निविदा प्रक्रियेच्यावेळी प्रशासनाची अडवणूक करण्याची प्रवृत्ती बळावू नये यासाठी चार ठेकेदारांना वर्षभरासाठी निविदा प्रक्रियेत सहभागासाठी प्रतिबंध करून त्यांच्या अनामत रकमा जप्त करण्याचा निर्णय घेतला आहे.” असे शहर अभियंता अर्जुन अहिरे म्हणाले.