कल्याण- धनदांगडे, वलंयाकित, नेते, पुढाऱ्यांना व्यक्तिगत संरक्षण देण्याचे काम बलदंड बलवान खासगी सुरक्षा (बाऊन्सर) रक्षक करतात. अशा धडधाकट असलेल्या बलवानाच्या कवचामुळे वलयांकित सुरक्षित असतो. अशाच एका बलवान बलदंड सुरक्षा रक्षकाचा महागडा मोबाईल गुरुवारी रात्री कल्याण मधील दुर्गाडी चौक भागातून भुरट्या चोरांनी हिसकावून पळून गेले.
दुचाकी स्वाराने बाऊन्सरला फरफटत नेल्याने तो जखमी झाला आहे. या प्रकारामुळे कल्याण शहरातील गुन्हेगारीने किती वरचे टोक गाठले आहे याची अनुभती लोकांना येत आहे. कल्याण रेल्वे स्थानक परिसर, शहरातील निर्जन ठिकाणी भुरटे चोर, गर्दुल्ले यांनी धुमाकूळ घातला आहे. रात्री १२ ते पहाटे चार वाजेपर्यंत कल्याण रेल्वे स्थानक भागात फक्त भुरट्या चोऱ्यांचा वावर असतो, अशी माहिती गस्तीवरील पोलिसांनी दिली.
हेही वाचा >>>ठाणे: राष्ट्रवादीचे पदाधिकारी विक्रम खामकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल
उल्हासनगर येथे राहणारे बाऊन्सर अंकुर शिंदे (३२) ठाणे येथे नोकरी करतात. गुरुवारी रात्री ते ठाणे येथून बसने भिवंडी मार्गे दुर्गाडी चौक येथे आले. दुर्गाडी चौक येथून रिक्षा वाहनतळावर पायी जात असताना त्यांच्या पाठीमागून दुचाकीवर बसलेले तीन जण आले. तुम्हाला कोठे जायचे आहे, अशी विचारणा दुचाकी स्वारांनी त्यांना केली. अंकुर यांना बोलण्यात गुंतवून ठेवले. तेवढ्यात अन्य एक दुचाकीस्वार तक्रारदार अंकुर शिंदे यांच्या जवळ वेगाने आला. त्याने अंकुर यांना काही कळण्याच्या आत त्यांच्या शर्टाच्या खिशातील मोबाईल घाईने हिसकावून पळ काढला.
हेही वाचा >>>तर गोर-गरीबांचे जीव वाचतील आणि पदरात पुण्य पडेल, आमदार डॉ.जितेंद्र आव्हाड यांचा सत्ताधाऱ्यांना सल्ला
अंकुर यांना मोबाईल चोरुन नेला जात असल्याचे समजताच त्यांनी धावत जाऊन दुचाकीचा पाठीमागील भाग पकडून भुरट्या चोराला पकडण्याचा प्रयत्न केला. चोरट्याने भरधाव दुचाकी चालवून अंकुर यांना फरफटत नेले. गंभीर दुखापत होण्यापेक्षा अंकुर यांनी दुचाकी सोडून दिली. फरफटल्यामुळे अंकुर यांना दुखापत झाली. दोन्ही दुचाकींवरील चोरटे भरधाव पळून गेले. बोलण्यात गुंतवून चोरट्यांनी मोबाईलची चोरी केली आणि दुखापत केल्याने बाऊन्सरने बाजारपेठ पोलीस ठाण्यात भुरट्या चोरांविरुध्द तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक ए. एस. गायकवाड तपास करत आहेत.