ठाणे : भिवंडी येथील क्वार्टरगेट भागात रविवारी चार वर्षीय मुलाचा मृतदेह चाळीतील पाण्याच्या टाकीमध्ये आढळल्याने खळबळ उडाली. शुक्रवारी दुपारपासून तो बेपत्ता होता. टाकीमध्ये बुडून त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.
क्वार्टरगेट भागातील एका चाळीमध्ये विकीन्याश चव्हाण (४) हा त्याच्या कुटुंबासोबत राहात होता. शुक्रवारी दुपारी तो त्याच्या आजीसोबत बाहेर निघाला होता. आजी काही अंतरपुढे गेल्या. त्यांनी मागे पाहिले असता, त्यांना विकीन्याश आढळून आला नाही. याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकांकडून त्याचा शोध सुरू होता.
हेही वाचा – ठाणे : भिवंडीत उद्या पाणी पुरवठा नाही
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले. खबऱ्यांकडून माहिती घेतली. परंतु त्याचा शोध लागत नव्हता. रविवारी दुपारी त्याचा मृतदेह चाळीतील पाण्याच्या टाकीमध्ये तरंगताना आढळून आला. त्याच्या शरिरावर कोणतेही व्रण आढळून आले नाहीत. तो पाण्याच्या टाकीजवळ गेला असावा आणि त्यात त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.